कांदा महागल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले

व्यापारावर 20 ते 30 टक्के परिणाम, ग्राहकांची खरेदी घटली

    दिनांक :25-Aug-2026
Total Views |
मुंबई
onion prices राज्यात कांद्याच्या दरात झालेल्या वाढीचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या घरगुती अर्थसंकल्पावर झाला आहे. मुंबईसह अनेक बाजारपेठांमध्ये कांद्याचे भाव वाढल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ बसत असून, गृहिणींचे महिन्याचे बजेटही कोलमडले आहे. कांद्याच्या दरवाढीचा परिणाम घाऊक व्यापाऱ्यांवरही होत असून, ग्राहक पूर्वीच्या तुलनेत कमी प्रमाणात कांदा खरेदी करत असल्याने व्यापाऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
 

onion prices rise in maharashtra as low arrivals hit consumers and traders 
 
 
मुंबईतील विविध मंडयांमध्ये कांद्याच्या दरात वाढ झाल्याने व्यापारी आणि ग्राहकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. बाजारात कांद्याची आवक घटल्याने त्याचा थेट परिणाम दरांवर होत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. कांदा महागल्यामुळे ग्राहकांकडून आता गरजेपुरतीच खरेदी केली जात असून, त्याचा परिणाम कांद्याच्या विक्रीवर आणि व्यापारावर होत आहे.
कांद्याचे दर वाढल्याने मोठ्या प्रमाणात कांदा खरेदी करणाऱ्या ग्राहकांनीही खरेदीचे प्रमाण कमी केले आहे. परिणामी कांदा व्यापारावर सुमारे 20 ते 30 टक्क्यांचा परिणाम झाल्याचा दावा व्यापाऱ्यांनी केला आहे. बाजारात आवक कमी असताना दर वाढत आहेत आणि त्याचा भार थेट सामान्य ग्राहकांवर पडत आहे. सरकारने एक दिवस बाजारात येऊन प्रत्यक्ष व्यापार करून पाहावा, अशी मागणी करत व्यापाऱ्यांनी महागाईबाबत संताप व्यक्त केला. घरात बसून परिस्थिती समजत नाही, महागाईची झळ सामान्य जनतेलाच सहन करावी लागत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, बाजारात कांदा खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांमध्येही दरवाढीबाबत तीव्र नाराजी दिसून आली. एका महिलेने सरकारच्या योजनांवरच टीका करत, ‘लाडक्या बहिणीला दोन हजार रुपये दिले जातात आणि आमच्याकडूनच पाच हजार रुपये उकळले जात आहेत,’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. सरकारी योजनांमुळेच दैनंदिन जीवनातील वस्तूंचे दर वाढत असल्याचा आरोप करत, वाढत्या महागाईमुळे कुटुंबाचा आर्थिक ताळमेळ साधणे कठीण होत असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे.
दुसरीकडे, कांद्याच्या वाहतुकीशी onion prices  संबंधित घडामोडींमुळेही प्रश्न निर्माण झाले आहेत. नाशिक जिल्ह्यातील निफाड येथून गुवाहाटीला कांदा पाठवण्यासाठी मालगाडी रवाना होणार होती. मात्र, ही मालगाडी ऐनवेळी रद्द करण्यात आली. रेल्वे रॅक रद्द करण्यामागचे कारण अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही.लासलगावहून दिल्लीला कांदा पाठवण्यासाठी रेल्वे रॅक दाखल झाला आहे. मात्र, नॅशनल को-ऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन अर्थात एनसीसीएफने खरेदी केलेला कांदा अद्याप लोडिंगसाठी आलेला नसल्याने या वाहतुकीबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यातच लासलगावहून दिल्लीला कांदा पाठवण्यास ठाकरे गटाने विरोध दर्शवला आहे.कांद्याची आवक घटणे, वाढलेले दर आणि ग्राहकांकडून कमी झालेली मागणी यामुळे सध्या कांदा बाजारावर दबाव निर्माण झाला आहे. एकीकडे वाढत्या दराचा फटका ग्राहकांना बसत असताना दुसरीकडे विक्री घटल्याने व्यापाऱ्यांनाही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे कांद्याची आवक आणि पुरवठा सुरळीत होऊन दर नियंत्रणात कधी येणार, याकडे ग्राहक आणि व्यापाऱ्यांचे लक्ष लागले आहे.