पुणे
pmpml increases accident पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) स्वमालकीच्या बसमुळे अपघात होऊन व्यक्ती किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्यास देण्यात येणाऱ्या नुकसानभरपाईत वाढ करण्याचा निर्णय पीएमपीएमएलच्या संचालक मंडळाने घेतला आहे. यापुढे बस अपघातात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना तीन लाख रुपये, तर जखमी व्यक्तीस एक लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत देण्यात येणार आहे. तसेच अपघातात दुकान, घर, वाहन किंवा अन्य वैयक्तिक अथवा सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाल्यास त्यासाठीही भरपाई देण्याची स्वतंत्र कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे.
पीएमपीएमएलच्या संचालक मंडळाची सोमवारी बैठक झाली. या बैठकीला पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे, पुणे स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, पिंपरी-चिंचवड स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक मारणे, पीएमपीएमएलचे संचालक अजय खेडेकर, पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी तसेच पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड उपस्थित होते.
पीएमपीएमएलच्या स्वमालकीच्या बसना तृतीय पक्ष दायित्व विमा उतरविण्यापासून शासनाने सूट दिली आहे. त्यामुळे पीएमपीएमएलच्या बसच्या अपघातात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास किंवा ती जखमी झाल्यास आर्थिक मदत देण्यासाठी २०१५ मध्ये संचालक मंडळाने स्वतंत्र धोरण निश्चित केले होते. मात्र, अपघातात दुकान, घर, वाहन किंवा अन्य वैयक्तिक अथवा सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाल्यास भरपाई देण्यासाठी आतापर्यंत कोणतेही स्वतंत्र धोरण नव्हते.
या पार्श्वभूमीवर आता मालमत्तेच्या नुकसानीसाठी स्वतंत्र कार्यपद्धती निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अपघातानंतर झालेल्या नुकसानीचे प्रत्यक्ष मूल्यांकन बाह्य संस्था किंवा तज्ज्ञांकडून केले जाणार आहे. तृतीय पक्ष दायित्व विमा कंपन्या ज्या पद्धतीने नुकसानीचे मूल्यांकन करतात, त्याच धर्तीवर मूल्यांकन करणारी संस्था किंवा व्यक्ती नियुक्त अथवा मान्यताप्राप्त केली जाणार आहे. नुकसानभरपाईची रक्कम अदा करताना संबंधित मालमत्ताधारकाकडून प्रतिज्ञापत्रही घेण्यात येणार आहे.
यापूर्वी पीएमपीएमएलच्या बस अपघातात मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये, तर जखमी व्यक्तीस ५० हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत देण्याची तरतूद होती. संचालक मंडळाच्या नव्या निर्णयानुसार मृतांच्या वारसांना देण्यात येणारी मदत आता तीन लाख रुपयांपर्यंत, तर जखमींसाठीची मदत एक लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे.
या प्रकरणांमध्ये आवश्यक मंजुरी देणे तसेच परिस्थितीनुसार निर्णय घेण्याचे अधिकार पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडे राहणार आहेत. त्यामुळे बस अपघातातील जीवितहानीसोबतच मालमत्तेच्या नुकसानीबाबतही भरपाई मिळण्याचा मार्ग आता अधिक स्पष्ट झाला आहे.