धानाच्या बोनससाठी ‘प्रहार’चा शेतकर्‍यांसह ‘एल्गार’

जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा, जिल्हाप्रमुखाच्या तांत्रिकाच्या वेशाने वेधले लक्ष

    दिनांक :25-Aug-2026
Total Views |
गोंदिया
paddy-bonus-gondia-news धानाला बोनस, कृषी पंपांना २४ तास वीजपुरवठा आणि लाडक्या बहिणींना अनुदानाचा लाभ यासह शेतकर्‍यांच्या विविध प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या नेतृत्वाखाली मंगळवारी २५ ऑगस्ट रोजी तिरोडा तालुक्यातील नवेझरी ते गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालय असा भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. मोर्चात मोठ्या संख्येने शेतकरी व ट्रॅक्टर सहभागी झाल्याने तब्बल एक किलोमीटरपर्यंत ट्रॅक्टरची रांग दिसून आली. विशेष म्हणजे, प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख महेंद्र भांडारकर यांनी तांत्रिकांचे वेश धारण करून या आंदोलनात सहभागी होत प्रशासनाचे लक्ष वेधले.

gondia photo 
 
निवडणुकीच्या काळात धानाला बोनस देण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, अद्याप या घोषणेची प्रभावी अंमलबजावणी झालेली नाही. त्याचबरोबर अनेक लाडक्या बहिणींना अपात्र ठरवून अनुदानापासून वंचित ठेवण्यात येत असल्याचा आरोप करत धानाला बोनस देण्यात यावे, कृषी पंपांना २४ तास वीजपुरवठा करावा, यासह शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी शेकडो शेतकरी या ट्रॅक्टर मोर्चात सहभागी झाले होते. तिरोडा तालुक्यातील नवेझरी येथून सकाळी ९ वाजता निघालेला हा ट्रॅक्टर मोर्चा दुपारच्या सुमारास गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. जवळपास १ किमीपर्यंतची रांग आणि ट्रॅक्टरचा गडगडाट व शेतकर्‍यांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेले. विशेष म्हणजे, यावेळी प्रहारचे जिल्हा प्रमुख महेंद्र भांडारकर हे तांत्रिकाच्या वेशात या मोर्चात सहभागी झाले होते. सरकारकडून शेतकर्‍यांना वारंवार आश्वासने देऊन प्रत्यक्षात त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करीत सरकारला जागे करण्यासाठी तांत्रिकाची भूमिका साकारल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या मोर्चाचे सभेत रुपांतर करण्यात आले. यावेळी आंदोलकांच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दाणाणला होता.

आंदोलकांचा महामार्गावरच ठिय्या..
भुक-तहाण विसरून शेतकरी या अंदोलनात सहभागी झाले असून जिल्हाधिकार्‍यांनी आंदोलनाची दखल न घेता व्हिसीचा बहाणा करीत असल्याचा आरोप करत शेतकरी चांगलेच आक्रामक झाले. यावेळी काही संतप्त शेतकर्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील महामार्गावरच आपला ठिय्या मांडला. त्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करून शेतकर्‍यांची समजूत काढली. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंदोलकांनी धडक दिली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकार्यांनी आंदोलनस्थळ गाठून निवेदन स्वीकारले. व आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. 
 
अन्यथा तिव्र आंदोलन...
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घेण्यात आलेल्या सभेनंतर आंदोलक शेतकर्‍यांनी राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या नावाने विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. मात्र, मागण्यांवर सकारात्मक निर्णय न झाल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.