महाराष्ट्राच्या खेळाडूंवर बक्षिसांची बरसात!

ग्रँड स्लॅम विजेत्याला ३ कोटी

    दिनांक :25-Aug-2026
Total Views |
मुंबई,
prizes for Maharashtra's athletes महाराष्ट्रातील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने रोख पारितोषिक योजनेत मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पारितोषिक योजनेत सुधारणा आणि विस्तार करण्यास मंजुरी देण्यात आली. नॅशनल गेम्स, खेलो इंडिया तसेच दिव्यांग खेळाडूंच्या आणखी ६ प्रमुख स्पर्धांचा आता या योजनेत समावेश करण्यात आला आहे.राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये पदक जिंकणाऱ्या खेळाडूंच्या पारितोषिकातही वाढ करण्यात आली आहे. नॅशनल गेम्समध्ये सुवर्णपदक मिळवणाऱ्या खेळाडूला आता ७ लाख रुपये मिळतील. यापूर्वी ही रक्कम ५ लाख रुपये होती. रौप्यपदकासाठी ५ लाख रुपये आणि कांस्यपदकासाठी ३ लाख रुपये मिळतील. यापूर्वी रौप्यपदकासाठी ३ लाख, तर कांस्यपदकासाठी १.५ लाख रुपये दिले जात होते.
 
 
 
prizes for Maharashtra
 
युथ ऑलिम्पिक आणि युथ पॅरा ऑलिम्पिकमधील पदक विजेत्यांसाठीही मोठी वाढ करण्यात आली आहे. सुवर्णपदकासाठी ५० लाख रुपये, रौप्यपदकासाठी ३० लाख रुपये आणि कांस्यपदकासाठी २० लाख रुपये देण्यात येतील. यापूर्वी या पदकांसाठी अनुक्रमे २२.५० लाख, १५ लाख आणि ७.५ लाख रुपये दिले जात होते.वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्समधील कामगिरीसाठी सुवर्णपदक विजेत्याला १० लाख रुपये, रौप्यपदक विजेत्याला ७ लाख रुपये आणि कांस्यपदक विजेत्याला ५ लाख रुपये मिळणार आहेत. तर खेलो इंडिया स्पर्धेच्या सर्व प्रकारांमध्ये सुवर्णपदकासाठी ३ लाख रुपये, रौप्यपदकासाठी २ लाख रुपये आणि कांस्यपदकासाठी १ लाख रुपयांचे पारितोषिक निश्चित करण्यात आले आहे.
 
 
टेनिस, बॅडमिंटन आणि हॉकीमधील महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. टेनिसच्या ग्रँड स्लॅम स्पर्धेतील विजेत्या खेळाडूला तब्बल ३ कोटी रुपये, तर उपविजेत्याला २ कोटी रुपये देण्यात येतील. बॅडमिंटनच्या थॉमस कप, उबर कप आणि सुदीरमन कपमध्ये विजेत्याला ४० लाख रुपये आणि उपविजेत्याला २० लाख रुपये मिळतील.हॉकीमधील अझलन शाह कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विजेत्याला ४० लाख रुपये, तर उपविजेत्याला २० लाख रुपये मिळणार आहेत. कनिष्ठांच्या सुलतान जोहर कपमध्ये विजेत्याला २० लाख रुपये आणि उपविजेत्याला १० लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाईल.
 
 
खेळाडूंच्या यशामागे महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या क्रीडा मार्गदर्शकांसाठीही सरकारने स्वतंत्र तरतूद केली आहे. खेळाडूला मिळणाऱ्या रोख पारितोषिकाच्या १० टक्के रक्कम मार्गदर्शकांना दिली जाणार आहे. जास्तीत जास्त तीन मार्गदर्शकांमध्ये ही रक्कम विभागली जाईल. प्राथमिक प्रशिक्षण देणाऱ्या मार्गदर्शकाला ३० टक्के, कौशल्य विकास करणाऱ्या मार्गदर्शकाला ३० टक्के आणि अंतिम व प्रगत प्रशिक्षण देणाऱ्या मार्गदर्शकाला ४० टक्के वाटा मिळेल. कर्णबधिर, अंध आणि विशेष ऑलिम्पिकमधील खेळाडूंसाठीही योजनेचा विस्तार करण्यात आला आहे. डेफ ऑलिम्पिक, आयबीएसए वर्ल्ड चॅम्पियनशिप, अंध क्रिकेट वर्ल्ड कप आणि विशेष ऑलिम्पिक यांसारख्या महत्त्वाच्या ६ स्पर्धांचा यात समावेश करण्यात आला आहे. सहभागी देशांच्या संख्येनुसार पारितोषिकाच्या टक्केवारीसंदर्भातील अटीही शिथिल करण्यात आल्या आहेत. या निर्णयाचा अधिकृत शासन निर्णय लवकरच जारी केला जाणार आहे.