आमगाव
Amgaon जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य समिती तसेच सर्वसाधारण सभेत आमगाव शहरातील बनगाव प्राथमिक आरोग्य केंद्र बंद करून स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आल्यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून आमगाव शहरासह जवळच्या बनगाव, म्हाल्ही, किडंगीपार, रिसामा, पदमपूर आदी गावांतील नागरिकांच्या आरोग्य सुविधांवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. या निर्णयाचा स्थानिक काँग्रेस कमेटीतर्फे विरोध करण्यात आला असून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. तर तसे निवेदनही येथील आरोग्य अधिकार्यांमार्फत राज्याचे आरोग्यमंत्री यांना सादर करण्यात आले आहे.

येथील शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भूमेश्वर पटले यांची भेट घेऊन त्यांना महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या नावाने निवेदन देण्यात आले. बनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे स्थलांतर तातडीने थांबवून हे केंद्र याच ठिकाणी सुरू ठेवावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. बनगाव प्राथमिक आरोग्य केंद्र हे परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे असून, केंद्र बंद किंवा स्थलांतरित झाल्यास ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवांसाठी दूरवर जावे लागणार असल्याचे काँग्रेस पदाधिकार्यांनी सांगितले. जनतेच्या आरोग्याशी संबंधित असलेला हा निर्णय मागे न घेतल्यास नागरिकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव रामसिंह चौहान, सचिव इसुलाल भालेकर, जिल्हा पर्यावरण काँग्रेसचे अध्यक्ष बाबा मिश्रा, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष देवकांत बहेकार, कृषी मंडी संचालक महेश उके, जिल्हा ओबीसी काँग्रेसचे उपाध्यक्ष जगदीश चुटे, राधाकिसन चुटे, तालुका अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष पिंकेश शेंडे, तालुका अल्पसंख्याक विभागाचे कार्याध्यक्ष शब्बिर खान, रवी रहांगडाले, रितेश चुटे यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.