रोम,
Rafale's dogfight with J-16 इजिप्तमध्ये सुरू असलेल्या युद्धाभ्यासादरम्यान राफेल आणि चिनी लढाऊ विमान जे-१६ विमानांत डॉगफाईट झाली. जगातील अव्वल दर्जाच्या या दोन लढाऊ विमानांमधील या ‘डॉगफाईट’वर भारताचे बारीक लक्ष होते; हा जरी लष्करी सराव असला, तरी भारताच्या दृष्टीने त्याला विशेष महत्त्व होते.या लष्करी सरावादरम्यान, चिनी वैमानिकांना फ्रेंच लढाऊ विमानांविरुद्ध आपल्या क्षमतांची चाचणी घेण्याची संधी मिळाली. चीन आणि इजिप्त यांच्यात हा सराव सुरू असताना भारत त्यावर बारीक लक्ष ठेवून आहे; याचे कारण असे की, गेल्या वर्षी झालेल्या संघर्षात भारताची राफेल विमाने आणि पाकिस्तानने वापरलेली चीनची जे-१० विमाने समोरासमोर आली होती. चीन आणि इजिप्त यांच्यातील ‘ईगल्स ऑफ सिव्हिलायझेशन’या युद्धसरावामुळे, युद्धजन्य परिस्थितीत ही दोन विमाने कशी कामगिरी करतात आणि जे-१६ ची क्षमता काय आहे, हे समजून घेण्यास भारताला मदत होईल. ‘हिडन ड्रॅगन’ म्हणून ओळखले जाणारे जे-१६ हे जे-१० ची आधुनिक आवृत्ती आहे. या प्रदेशात चीनची हवाई ताकद वाढत असल्याने, या विमानांच्या कामगिरीबाबत भारताला रस असणे स्वाभाविक आहे.
पाकिस्तान सध्या चीनमध्ये बनवलेली जे१- सी आणि जेएफ-१७ ही विमाने वापरत आहे. त्यांनी जे-१६ लढाऊ विमाने खरेदी करण्यातही रस दाखवला आहे. त्यामुळे भारतासाठी या हालचालींवर बारीक लक्ष ठेवणे अधिक महत्त्वाचे ठरते. दरम्यान, भारत फ्रान्सकडून आणखी ११४ राफेल विमाने खरेदी करण्याची योजना आखत आहे. या लष्करी सरावाचा दुसरा टप्पा २२ ऑगस्ट रोजी सुरू झाला. चीनच्या जे-१६ विमानांनी सोमवारी राफेल विमानांसोबत डॉगफाईटचा सराव केला. प्रत्यक्ष युद्धासारख्या परिस्थितीमध्ये वैमानिकांनी ही तीव्र लढाई लढली. या सरावात इजिप्तच्या मिग-२९ विमानांनीही सहभाग घेतला. चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ने प्रसिद्ध केलेल्या दृश्यांमध्ये, राफेल' विमान जे-१६ विमानापासून अगदी कमी अंतरावर विविध हवाई कसरती करताना दिसून आले. चिनी लढाऊ विमानाने राफेलविरुद्ध थेट हवाई लढाईचा सराव करण्याची ही पहिलीच वेळ होती.
जे-१६ विमानाचे तांत्रिक स्वरूप
जे-१६ आणि राफेल ही दोन्ही ४.५ पिढीची लढाऊ विमाने आहेत ज्यात आधुनिक एव्हीओनिक्स, प्रगत रडार आणि इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणाली आहेत. जे-१६ हे चीनच्या एव्हिएशन इंडस्ट्री कॉर्पोरेशनने तयार केलेले, वजनदार श्रेणीतील आणि बहु-उद्देशीय लढाऊ विमान आहे. हे चीनच्या सर्वोत्तम लढाऊ विमानांपैकी एक मानले जाते; यात विविध प्रकारची शस्त्रे वाहून नेण्याची क्षमता असून, जे-१० मालिकेच्या तुलनेत याची मारक क्षमता अधिक आहे. तसेच, जे-१६ हे दोन इंजिने आणि दोन आसने असलेले विमान असून, त्याची रचना प्रामुख्याने दूरवरच्या अंतरावरील मोहिमांसाठी करण्यात आली आहे.