अबब...किचनच्या स्लॅबखाली महिलेचा मृतदेह

    दिनांक :25-Aug-2026
Total Views |
पुरी,
womans body found under kitchen slab ओडिशातील पुरी जिल्ह्यातील कुंभारपाडा परिसरात एका भाड्याच्या घरातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घराच्या स्वयंपाकघरातील स्लॅबखालून एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात महिलेच्या मुलावर संशय व्यक्त केला जात असून तो रविवारपासून बेपत्ता असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला सुमारे दोन महिन्यांपूर्वी आपल्या मुलासोबत या भाड्याच्या घरात राहण्यासाठी आली होती. काही दिवसांपासून घराच्या किचनमधून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत होती. हा वास वाढत गेल्याने घरमालकाला संशय आला आणि त्याने पोलिसांना याची माहिती दिली.

 
womans body found under kitchen slab
 
पोलिस घटनास्थळी पोहोचले असता स्वयंपाकघरातील परिस्थिती संशयास्पद असल्याचे दिसून आले. स्लॅबच्या आसपास घाणेरडे पाणी आणि कचरा दिसत होता, तर परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली होती. त्यामुळे स्लॅबखाली काहीतरी लपवण्यात आले असावे, असा संशय पोलिसांना आला. त्यानंतर पोलिसांनी स्लॅबचा भाग तोडून पाहिला असता त्यातून महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

 
पुरीचे एसपी प्रतीक सिंग यांनी या घटनेची माहिती देताना सांगितले की, महिलेचा मृतदेह स्लॅबच्या आतून बाहेर काढण्यात आला आहे. प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले असून घटनास्थळी वैज्ञानिक पथकालाही पाचारण करण्यात आले होते. वैज्ञानिक पथकाने घटनास्थळावरून काही नमुने आणि इतर पुरावे गोळा केले आहेत. त्याआधारे पोलीस पुढील तपास करत आहेत. दरम्यान, महिलेचा मुलगा रविवारपासून बेपत्ता असल्याने तपासात हा मुद्दा महत्त्वाचा ठरला आहे. त्याचा सध्या कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही. त्यामुळे महिलेच्या मृत्यूशी त्याचा काही संबंध आहे का, याचाही पोलीस तपास करत आहेत. मात्र, या प्रकरणातील नेमकी वस्तुस्थिती तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

 
महिलेचा मृत्यू नेमका कधी आणि कशामुळे झाला, तिची हत्या झाली असल्यास ती कशी करण्यात आली आणि मृतदेह स्वयंपाकघरातील स्लॅबखाली कसा लपवण्यात आला, याचा शोध पोलीस घेत आहेत. महिलेची ओळख, मृत्यूचे कारण आणि तिच्या मुलाच्या भूमिकेबाबत तपासातून अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. दरम्यान, ओडिशातील बलांगीर जिल्ह्यात यापूर्वी नरबळीचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. देवगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बागडा गावात एका व्यक्तीची हत्या करून त्याचे शीर धडापासून वेगळे करण्यात आले होते.