‘मी ठणठणीत बरा आहे...’; स्वतःच्या मृत्यूची बातमी पाहून सिद्धार्थ जाधव संतापला

    दिनांक :25-Aug-2026
Total Views |
मुंबई
siddharth jadhav अभिनेता सिद्धार्थ जाधव याला आज कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. केवळ मराठीच नव्हे, तर हिंदी सिनेसृष्टीतही आपल्या अभिनयाच्या जोरावर त्याने स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. मात्र, सध्या सिद्धार्थच्या मृत्यूची खोटी बातमी सोशल मीडियावर पसरल्याने एकच खळबळ उडाली आहे. स्वतःच्याच मृत्यूची बातमी पाहिल्यानंतर अभिनेत्याने संताप व्यक्त करत सोशल मीडियाच्या माध्यमातून खोटी माहिती पसरवणाऱ्यांना चांगलेच सुनावले आहे.
 

siddharth jadhav reacts angrily to fake death news and confirms he is healthy and shooting for his upcoming projects 
सिद्धार्थने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एका युट्यूब चॅनलचा स्क्रीनशॉट दिसत असून, त्यावर ‘अभिनेते सिद्धार्थ जाधव यांची मृत्यूशी झुंज... गंभीर आजार...’ अशा आशयाची हेडलाइन असल्याचे दिसते. ही बातमी पाहिल्यानंतर सिद्धार्थने व्हिडीओसोबत सविस्तर पोस्ट करत आपली प्रकृती उत्तम असल्याचे स्पष्ट केले आहे. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांसह अनेकांनी प्रतिक्रिया देत त्याला पाठिंबा दिला आहे.
सिद्धार्थने पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे, ‘नमस्कार, मी ठणठणीत बरा आहे... व्यवस्थित ॲनिमलचे प्रयोग... धिंगाणाचं शूट सुरू आहे. ज्या ज्या लोकांनी काळजीने मेसेज/कॉल केलेत, त्यांना मनापासून धन्यवाद... बातमीदार, जरा मलातरी विचारा. एवढी कसली घाई आहे तुम्हाला? ज्याने हेडलाइन/कव्हरेज बनवलाय, त्याला तर नोबेल द्याच... Man is a more dangerous Animal than an “ANIMAL”.’
यानंतर सिद्धार्थने या प्रकाराचा आपल्या नाटकाच्या प्रमोशनसाठी उपरोधिक पद्धतीने उल्लेख केला आहे. ‘त्यांचं जाऊदे... निदान माझ्या नाटकाचं तरी प्रमोशन करतो. न्यूजवाले, या माझ्या नाटकाला... २६ ऑगस्ट, ८ वा., छत्रपती शिवाजी मंदिर, दादरला...’ असे म्हणत त्याने नाटकाच्या प्रयोगाची माहितीही दिली आहे.
स्वतःच्या मृत्यूची खोटी बातमी पसरवल्याने संतापलेल्या सिद्धार्थच्या या पोस्टची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. अनेक चाहत्यांनी त्याच्या पोस्टवर कमेंट करत अशा प्रकारच्या खोट्या बातम्यांबाबत नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, काळजीपोटी फोन आणि मेसेज करणाऱ्या चाहत्यांचे सिद्धार्थने मनापासून आभार मानले आहेत.सिद्धार्थ जाधवने आपल्या मेहनतीच्या जोरावर मराठी आणि हिंदी मनोरंजनसृष्टीत भक्कम स्थान निर्माण केले आहे. त्याचा मोठा चाहतावर्ग असून, त्याच्या आगामी चित्रपट आणि नाटकांची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. विविध कारणांमुळे तो सातत्याने चर्चेत असतो. मात्र, यावेळी त्याच्या मृत्यूची खोटी बातमी पसरल्याने त्याला स्वतः सोशल मीडियावर येऊन आपल्या प्रकृतीबाबत स्पष्टीकरण द्यावे लागले आहे.