भर मैदानात श्रीलंकेचा पारा चढला आणि अंपायरशी वाद video

    दिनांक :25-Aug-2026
Total Views |
कोलंबो,
Sri Lanka team's dispute with umpire भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेतील अखेरचा सामना मैदानावरील वादांमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. पहिल्या दिवशी यशस्वी जयस्वाल आणि श्रीलंकेचा गोलंदाज असिथा फर्नांडो यांच्यातील वादानंतर आता दुसऱ्या दिवशीही अंपायरच्या निर्णयावरून श्रीलंकेच्या खेळाडूंमध्ये नाराजी पाहायला मिळाली. प्रकाश कमी झालेला असतानाही सामना सुरू ठेवण्याच्या निर्णयावर श्रीलंकेच्या फलंदाजांनी आक्षेप घेतला.श्रीलंकेच्या डावाला सुरुवात झाल्यानंतर दुसऱ्या षटकापूर्वी मैदानातील प्रकाशमानतेचा मुद्दा उपस्थित झाला. प्रभात जयसूर्या भारतीय फिरकीपटू मानव सुथारचा सामना करण्यासाठी स्ट्राइकवर येत असताना मैदानात प्रकाश कमी असल्याचे जाणवले. त्यानंतर दोन्ही अंपायरनी लाइट मीटरच्या माध्यमातून परिस्थिती तपासली.
 
 
 
Sri Lanka team
 
तपासणीनंतर पंचांनी वेगवान गोलंदाजांकडून गोलंदाजी न करता केवळ फिरकी गोलंदाजांकडूनच गोलंदाजी केली, तर सामना सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार भारतीय कर्णधार शुभमन गिलने चेंडू मानव सुथारकडे सोपवला आणि खेळ पुढे सुरू राहिला.मात्र, अंपायरच्या या निर्णयावर श्रीलंकेचे फलंदाज प्रभात जयसूर्या आणि कामिल मिश्रा यांनी नाराजी व्यक्त केली. प्रकाश कमी असतानाही खेळ सुरू ठेवण्यात आल्याने त्यांची नाराजी मैदानावरच दिसून आली. तरीही पंचांनी सामना सुरू ठेवला.
 
 
 
 
दिवसाच्या शेवटच्या चेंडूवर या वादाला आणखी नाट्यमय वळण मिळाले. मानव सुथारच्या गोलंदाजीवर प्रभात जयसूर्या एलबीडब्ल्यू बाद झाला. विकेट गमावल्यानंतर तो प्रचंड नाराज दिसत होता. पॅव्हेलियनकडे जाताना त्याने अंपायरकडे रागाने पाहिले, तर ड्रेसिंग रूममध्ये पोहोचल्यानंतर हातातील ग्लोव्हजही फेकून दिले.जयसूर्याची विकेट पडताच पंचांनी दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्याची घोषणा केली. दिवसअखेर श्रीलंकेची अवस्था ३ षटकांत ८ धावांवर २ विकेट अशी होती. भारताच्या पहिल्या डावातील मोठ्या धावसंख्येपासून श्रीलंका अजूनही ४९५ धावांनी मागे होती. भारताकडून प्रसिद्ध कृष्णा आणि मानव सुथार यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. दरम्यान, सामन्याच्या पहिल्याच दिवशी यशस्वी जयस्वाल आणि असिथा फर्नांडो यांच्यात विकेट सेलिब्रेशनवरून वाद झाला होता. या घटनेची दखल घेत आयसीसीने दोन्ही खेळाडूंवर कारवाई केली होती. त्यामुळे दुसऱ्या दिवशी अंपायरच्या निर्णयावरून झालेल्या वादामुळे सामन्यातील तणाव आणखी वाढला.