तभा ग्राऊंड रिपोर्ट
अनिल कांबळे/पराग मगर
नागपूरः
ground-report godhani प्रल्हाद जगनेत (72) परिवारासह सोमवारी दुपारच्या सुमारास गोधनीतील फागुजीनगर परिसरातील जलशुद्धीकरण केंद्राला लागूनच असलेल्या घरी परतले. त्यांच्या घशातून अजूनही आवाज निघत नव्हता. डोळे चुरचुरत होते. रविवारी मध्यरात्री ही गॅसगळती झाल्यानंतर संपूर्ण परिवाराला श्वास घेण्यास त्रास व्हायला लागला. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिस पथकांनी नागरिकांना घरांतून बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलविले. जगनेतसह परिसरातील अनेक परिवारांनी गोधनी येथील हनुमान मंदिरात रात्र काढली.
प्रल्हाद जगनेत सांगतात, रात्री 1 नंतर गॅसगळतीने श्वास घ्यायला त्रास होत असल्याने सर्वांनाच अस्वस्थ वाटायला लागले. त्यांच्या पत्नी चंद्रकला यांनाही जाग आली. श्वास घेण्यास त्रास व्हायला लागला. घरातील सिलेंडर गॅस सुरू राहिला असा संशय त्यांना आला. परंतु घरातील गॅस सिलेंडर बंद होता. बाहेर सायरनचा आवाज यायला लागला होता. त्यामुळे काहीतरी गडबड असल्याचे सर्वांनाच जाणवले. आम्ही तत्काळ बाहेर पडून स्वत:चा बचाव केला,असे जगनेत सांगतात.
परिसरात शुकशुकाट
फागुजीनगर परिसरातील जलशुद्धीकरण केंद्रातून क्लोरिन गॅसची गळती झाल्याने विषारी वायू आसपासच्या परिसरात पसरला. शेकडो घरांमधील रहिवाशांना श्वसनाचा त्रास सुरू झाल्यानंतर प्रशासनाने मध्यरात्री नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले. सोमवारी दुपारपर्यंतही अनेक कुटुंबे घरी परतलेली नव्हती. त्यामुळे परिसरातील रस्त्यांवर शुकशुकाट दिसत होता.
‘हा प्रकल्प तातडीने हटवा’
जलशुद्धीकरण केंद्रालगत राहणारे सुमेश नारनवरे यांनी या घटनेबाबत संताप व्यक्त केला. त्यांच्या मते, हा परिसर निवासी असून गेल्या तीन वर्षांपासून येथे जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आला आहे. स्थानिक नागरिकांनी प्रकल्प उभारणीच्या सुरुवातीपासून विरोध केला. या ठिकाणी यापूर्वी अन्य प्रकल्प प्रस्तावित होता. मात्र राजकीय दबावामुळे येथे जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. निवासी भागात अशा प्रकारचा प्रकल्प ठेवणे धोकादायक असून, तो येथून तातडीने हटवावा, अशी मागणी नारनवरे यांनी केली.
रात्री सुरक्षारक्षकही नसल्याचा आरोप
या प्रकल्पात सुमारे 40 मजूर काम करतात. त्यातील बहुतांश मजूर परप्रांतीय असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. रात्रीच्या वेळी काम बंद असले तरी प्रकल्प परिसरात मोठ्या प्रमाणात साहित्य ठेवलेले असते. प्रकल्पालगतच्या झोपडपट्टी परिसरातील काही युवक भिंतीवरून उड्या मारून प्रकल्पात प्रवेश करून साहित्य चोरी करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे परिसरात चोरीच्या घटनाही वाढल्याचा दावा स्थानिकांनी केला. अशी बिकट परिस्थिती असतानाही रात्रीच्या वेळी प्रकल्पाच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक नसल्याचे नारनवरे यांनी सांगितले.
मेयोच्या 25 डॉक्टर्सकडून तपासणी
क्लोरिन गॅसच्या संपर्कामुळे शेकडो नागरिकांना श्वसनाचा त्रास झाला. काही नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, परिसरातील नागरिकांसाठी मेयो रुग्णालयाच्या वतीने मंदिरातच वैद्यकीय तपासणी शिबिर घेण्यात आले. मेयोच्या कम्युनिटी मेडिसिन विभागातील वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. सामी यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 25 डॉक्टर्सच्या पथकाने नागरिकांची तपासणी करून उपचार केले. श्वास घेण्यास त्रास होणे आणि डोळ्यांत जळजळ होणे, या तक्रारी बहुतांश नागरिकांनी केल्याची माहिती डॉ. सामी यांनी दिली.
या गॅस गळतीने बाधित काही रुग्णांवर स्पर्श रुग्णालयात रात्रीपासून उपचार सुरू आहेत. यातील काही जणांना सुटी देण्यात आली असून सध्या सहा रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एका रुग्णाला मध्यरात्री विवेका, तर एकाला एम्समध्ये हलविण्यात आले.
डॉ. मितुल चव्हाण
निवासी वैद्यकीय तज्ज्ञ, स्पर्श रुग्णालय, गोधनी