दुलीप ट्रॉफीत सूर्यवंशीचे 'वैभव' हरपले

६ चेंडूत ८ धावा, जर्सीने मात्र वेधलं लक्ष

    दिनांक :25-Aug-2026
Total Views |
बंगळुरू,
Suryavanshi out early in Duleep Trophy भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील युवा चर्चेचा चेहरा असलेल्या १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या दुलीप ट्रॉफी पदार्पणाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, ईस्ट झोनकडून नॉर्थ ईस्ट झोनविरुद्ध खेळताना वैभवला पहिल्या डावात केवळ ६ चेंडूंचा सामना करता आला. दोन चौकारांच्या मदतीने त्याने ८ धावा केल्या आणि त्याचा डाव वेगवान गोलंदाज बिश्वोरजीत कोंथौजमने संपवला.बंगळुरूतील सेंटर ऑफ एक्सलन्स येथे सुरू असलेल्या या सामन्यात ईशान किशनच्या नेतृत्वाखालील ईस्ट झोन संघात वैभव उपकर्णधार म्हणून मैदानात उतरला होता. त्याच्याकडून आक्रमक फलंदाजीची अपेक्षा होती. सुरुवातीपासूनच त्याने आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीची झलक दाखवली आणि दोन आकर्षक चौकारही ठोकले. मात्र, त्याचा डाव फार काळ टिकला नाही.
 
 

vai bhav 
 
वैभव बाद झाल्यानंतर पॅव्हेलियनकडे परतत असताना त्याच्या जर्सीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. जर्सीच्या मागील बाजूला असलेल्या क्रमांकाच्या एका भागावर टेप लावलेला दिसून आला. यामुळे त्याच्या जर्सी क्रमांकाबाबत सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये विविध चर्चा सुरू झाल्या.वैभवसाठी ३ हा क्रमांक विशेष महत्त्वाचा आहे. आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना तसेच भारतीय ज्युनियर संघाचे प्रतिनिधित्व करताना त्याने ३ क्रमांकाची जर्सी वापरली आहे. या क्रमांकाची निवड करण्यामागे त्याच्या आईचा सल्लाही असल्याचे त्याने यापूर्वी सांगितले होते. त्याच्या आईने १२ क्रमांकाऐवजी ३ क्रमांकाची जर्सी निवडण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे ३ हा क्रमांक वैभवसाठी केवळ जर्सीवरील आकडा नसून त्याच्याशी जोडलेला वैयक्तिक विश्वासही आहे.
 
 
वैभवची फलंदाजी लवकर संपली असली तरी ईस्ट झोनने सामन्यावर मजबूत पकड मिळवली. शाहबाज अहमद आणि सुदीप कुमार घरामी यांनी शानदार शतके झळकावत संघाच्या धावसंख्येला मोठी चालना दिली. त्यांच्या शतकांच्या जोरावर ईस्ट झोनने पहिल्या डावात ४६७ धावांचा भक्कम स्कोअर उभारला. यानंतर ईस्ट झोनच्या गोलंदाजांनीही प्रभावी कामगिरी केली. अभिजीत के. सरकारने भेदक मारा करत ५ विकेट्स घेतल्या. त्याच्या गोलंदाजीसमोर नॉर्थ ईस्ट झोनचा पहिला डाव अवघ्या १११ धावांवर आटोपला. त्यामुळे ईस्ट झोनने नॉर्थ ईस्ट झोनला फॉलोऑन दिला आणि सामन्यावर आपली पकड आणखी मजबूत केली.