उंबर्डाबाजार परिसरातील पिकांवर किडींचा प्रादूर्भाव

किटकनाशक फवारणी च्या कामात शेतकरी मग्न

    दिनांक :25-Aug-2026
Total Views |
उंबर्डा बाजार,
umbardabazar area उंबर्डाबाजार परिसरात सुरूवातीला पावसाअभावी पिके संकटात आली असता आता रिमझीम पावसाने संजीवनी मिळालेल्या सोयाबीन पिकांवर किडे व उंटअळीचा प्रादुर्भाव आढळून येत असल्याने शेतकर्‍यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सध्यस्थितीत महागडी किटकनाशक औषधी फवारणी करूनही अळ्याचे प्रमाण जैसे थे दिसत असल्याने शेतकरी वर्ग चिंताग्रस्त दिसत आहे. सोयाबीन प्रमाणेच कपाशी पिकांवर सुध्दा काही भागात मावा, कोकडा, पांढरी माशी व अळ्यामुळे शेतकरी बांधव पिकावर औषध फवारणीच्या कामाला लागल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
 
 
umbardabazar area
 
रिमझीम पाऊस तथा ढगाळ वातावरण किड तथा अळ्यासाठी पोषक ठरत असल्याने शेतकरी वर्गाच्या चिंतेत वाढ झाली आहे. आधीच गेल्या दोन तीन वर्षापासून कमी पावसामुळे पिकांच्या उत्पादनात घट झाल्याने आधीचअडचणीत असलेल्या शेतकरी बांधवासमोर पुन्हा पिकांवर आलेल्या रोगांमुळे संकट निर्माण झाले आहे परिसरात यावर्षी सोयाबीन, कपाशी आदी पिकाचा पेरा मोठ्या प्रमाणात आहे. सोयाबीन वर आलेल्या अळ्या पिकांचे पाने कुरतडत आहे. तर कपाशी वर सुध्दा मावा, कोकडा तथा पांढर्‍या माशीचा प्रादुर्भाव दिसत असल्याने महागामोलाचे बियाणे घेवून पेरलेल्या पिकांचे उत्पादन घटणार कि काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.
 
 
पावसाचे प्रमाण समाधानकारक आहे. परंतु अध्याप ही उंबर्डाबाजारसह परिसरात दमदार पाऊस झाला नसल्याने पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे दमदार पाऊस आल्यास पिकावरील रोगांना मोठ्या प्रमाणात आळा बसू शकतो म्हणून शेतकरी बांधव दमदार पावसाच्या प्रतिक्षेत आहे. महागडी किटकनाशकाची फवारणी करूनही पाहीजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याने शेतकरी वर्ग चिंतामग्न दिसत आहे.तरी याकडे लक्ष देऊन कृषी विभागाच्या वरीष्ठ अधिकारी वर्गांनी बाधित शेतीची पाहणी करून शेतकर्यांना योग्य मार्गदर्शन करावे अशी मागणी उंबर्डा बाजार परिसरातील शेतकरी करत आहे.