गडचिरोली,
shashikant shinde जिल्ह्यातील रस्त्यांची झालेली दुरवस्था, उद्घाटनानंतर अवघ्या तीन वर्षांत खचलेला पूल, आरोग्य व्यवस्थेचा उडालेला बोजवारा आणि उपचाराअभावी माता-बाळाचा झालेला मृत्यू, यामुळे मुख्यमंत्रीच पालकमंत्री असलेल्या गडचिरोली जिल्ह्याची दुर्दशा पाहवत नाही, अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केली.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यासाठी शिंदे गडचिरोलीत आले होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. माजी गृहमंत्री अनिल देशमुख, जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार, हिरालाल बोरकुटे, ड. संजय ठाकरे, शेमदेव चापले आदी उपस्थित होते. गडचिरोलीला ‘स्टील हब’ म्हणून ओळख निर्माण करून देण्याच्या घोषणा सरकारकडून केल्या जात असल्या, तरी दुसरीकडे जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था ढासळली आहे. रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची कमतरता असून तलाठी, ग्रामसेवकांसह विविध विभागांतील पदे रिक्त आहेत. रस्ते व पुलांच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही शिंदे यांनी केला.
जिल्ह्यातील सुपीक जमिनी उद्योगपतींसाठी बळकावल्या जात असल्याचा आरोप करताना कंत्राटदारांची देयके रखडली आहेत, असेही त्यांनी सांगितले. ‘लाडकी बहीण’ योजनेत कोणतीही चौकशी न करता निधी वाटण्यात आला आणि आता केवायसीच्या नावाखाली त्याच महिलांना वेठीस धरले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
माता-बाळाच्या मृत्यूची चौकशी करणार
चामोर्शी तालुक्यात उपचाराअभावी झालेल्या माता-बाळाच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही शिंदे यांनी दिला. सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले असून गडचिरोलीच्या विकासाच्या दाव्यांमागील वास्तव जनतेसमोर आणले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.