पॅरिस,
hindu temple in paris फ्रान्सची राजधानी पॅरिसजवळील बुसी-सेंट-जॉर्जेस येथे बीएपीएस स्वामीनारायण हिंदू मंदिराचे भव्य उद्घाटन सप्टेंबरमध्ये होणार आहे. भारताच्या पारंपरिक संस्कृतीला फ्रान्सच्या भूमीवर नवी ओळख देणारे हे मंदिर भारत आणि फ्रान्समधील वाढत्या सांस्कृतिक संबंधांचे महत्त्वाचे प्रतीक मानले जात आहे. धार्मिक केंद्रासोबतच भारतीय संस्कृती, सामुदायिक सहभाग आणि विविध धर्मांमधील सलोखा वाढवणारे केंद्र म्हणूनही या मंदिराची ओळख निर्माण होणार आहे.
सुमारे ५,००० चौरस मीटर परिसरात मंदिराचे संपूर्ण संकुल उभारण्यात आले आहे. सप्टेंबरमध्ये मंदिर अधिकृतपणे भाविकांसाठी खुले केले जाणार असून, यानिमित्त २ ते १४ सप्टेंबरदरम्यान तब्बल १३ दिवसांचा ‘संस्कृती महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. महंत स्वामी महाराज यांच्या हस्ते या सोहळ्याचे उद्घाटन होणार असून फ्रान्ससह जगभरातून हजारो भाविक या ऐतिहासिक कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.
या १३ दिवसांच्या महोत्सवात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २ सप्टेंबर रोजी पालखी यात्रा सुरू होणार असून याच दिवशी वैदिक महायज्ञालाही सुरुवात होईल. हा यज्ञ १३ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. ३ सप्टेंबरला जल यात्रा, तर ५ सप्टेंबरला नगर यात्रा होणार आहे. ६ सप्टेंबर हा मंदिराच्या दृष्टीने महत्त्वाचा दिवस असून या दिवशी मूर्ती प्रतिष्ठापना आणि समर्पण सभा आयोजित करण्यात आली आहे. १३ सप्टेंबरला महंत स्वामी महाराजांची जयंती आणि १४ सप्टेंबरला हिंदू सांस्कृतिक महोत्सवाने या भव्य कार्यक्रमाची सांगता होईल. मंदिराच्या वास्तुरचनेत भारतीय परंपरा आणि आधुनिक फ्रेंच अभियांत्रिकीचा सुंदर मिलाफ करण्यात आला आहे. संकुलाच्या वरच्या भागात पारंपरिक मंदिराची रचना करण्यात आली आहे, तर खालच्या भागात ‘मरू गुर्जर’ वास्तुशैलीवर आधारित भव्य सांस्कृतिक वास्तू उभारण्यात आली आहे.
मंदिराच्या संपूर्ण रचनेत पाच भव्य शिखरे, दहा उंच घुमट, २० कलाकुसर केलेले स्तंभ, १२० कोरीव खिडक्या, ४९ शिल्पपट आणि चार आकर्षक छत्र्यांचा समावेश आहे. या वास्तूच्या बांधकामासाठी ग्रीस, इटली, व्हिएतनाम आणि भारतातून विशेष संगमरवर आणण्यात आला, तर ग्वाल्हेरमधून वाळूचा दगड आणण्यात आला. या दगडांवर भारतातील कुशल कारागिरांनी हाताने नक्षीकाम केले आणि त्यानंतर हे कोरीव दगड फ्रान्समध्ये नेऊन मंदिराच्या वास्तूमध्ये बसवण्यात आले.
मंदिराच्या उद्देशाबाबत महंत स्वामी महाराज यांनीही महत्त्वाचा संदेश दिला आहे. त्यांच्या मते, हे मंदिर केवळ एखाद्या एका समाजाची ओळख अधोरेखित करण्यासाठी उभारलेले नसून, विविध ओळखी आणि पार्श्वभूमी असलेल्या लोकांना एकत्र आणण्याचे माध्यम आहे. प्रत्येकाचे मार्ग वेगवेगळे असू शकतात, मात्र परस्पर आदर आणि सहअस्तित्वाची भावना सर्वांमध्ये समान असू शकते, असा संदेश त्यांनी दिला. त्यामुळे पॅरिसमधील हे मंदिर केवळ धार्मिक वास्तू न राहता भारतीय संस्कृती, कला, वास्तुशास्त्र आणि विविधतेतील एकतेचा संदेश देणारे महत्त्वाचे केंद्र ठरण्याची अपेक्षा आहे.