बंगळुरू,
Vaibhav's spin spell दुलीप ट्रॉफीच्या क्वार्टर फायनलमध्ये युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीला बॅटने अपेक्षित कामगिरी करता आली नाही. मात्र, गोलंदाजीची संधी मिळताच त्याने आपल्या फिरकीची ताकद दाखवत अवघ्या चार चेंडूंमध्ये दोन विकेट्स घेत शानदार कमबॅक केले. ईस्ट झोन आणि नॉर्थ ईस्ट झोन यांच्यात सुरू असलेल्या सामन्यात वैभवच्या या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधले.ईस्ट झोनकडून डावाची सुरुवात करण्यासाठी आलेल्या वैभवकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र, त्याचा डाव केवळ ६ चेंडूंत ८ धावांवर संपला. त्याने दोन चौकार लगावले. विशेष म्हणजे या ८ धावांमध्ये एकही धाव त्याने धावून घेतलेली नव्हती. वैभव अपयशी ठरला असला तरी ईस्ट झोनच्या अन्य फलंदाजांनी नॉर्थ ईस्ट झोनच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला.
सुदीप कुमार घरामीने १४६ धावांची शानदार खेळी केली, तर शहबाज अहमदने १६७ धावा ठोकल्या. या दोघांच्या शतकांच्या जोरावर ईस्ट झोनने पहिल्या डावात तब्बल ४६७ धावांची मोठी धावसंख्या उभारली. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या नॉर्थ ईस्ट झोनचा पहिला डाव अवघ्या १११ धावांवर आटोपला आणि त्यांच्यावर फॉलोऑनची वेळ आली.दुसऱ्या डावातही नॉर्थ ईस्ट झोनची अवस्था बिकट असताना ईस्ट झोनचा कर्णधार ईशान किशनने वैभव सूर्यवंशीच्या हातात चेंडू सोपवला. मिळालेल्या या संधीचा वैभवने पुरेपूर फायदा घेतला. त्याने सलग चार चेंडूंमध्ये दोन विकेट्स घेत नॉर्थ ईस्ट झोनला मोठा धक्का दिला. किशन लिंगडोह आणि इमलीवती लेमटूर हे वैभवच्या फिरकीचे बळी ठरले. तीन षटकांच्या स्पेलमध्ये त्याने केवळ ११ धावा देत दोन विकेट्स मिळवल्या. ईस्ट झोनने सामन्यावर मजबूत पकड मिळवल्याने त्यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. दुलीप ट्रॉफीचा हा क्वार्टर फायनल सामना असल्याने ईस्ट झोनने विजय मिळवल्यास त्यांना थेट उपांत्य फेरीत प्रवेश मिळणार आहे. वैभवला या सामन्यात पुन्हा फलंदाजीची संधी मिळणार नसली, तरी ईस्ट झोनने उपांत्य फेरी गाठल्यास त्याच्यासमोर बॅटने दमदार पुनरागमन करण्याची आणखी एक संधी असेल.