शौचालयाच्या बाजूला पांढरे वाटाणे हिरवे करण्याचा Video!

    दिनांक :25-Aug-2026
Total Views |
मुंबई,
Video on turning white peas green कांदिवली पश्चिम परिसरात अन्नभेसळीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सार्वजनिक शौचालयाच्या अगदी शेजारी मोठ्या ड्रममध्ये हिरव्या रंगाचे पाणी तयार करून त्यात पांढरे वाटाणे भिजवून हिरव्या रंगाचे करण्याचा प्रकार सुरू असल्याचे आढळले. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी स्थानिक रहिवासी अॅलन राजू यांनी हा प्रकार पाहिला. त्यांनी संपूर्ण घटना आपल्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, एका फेरीवाल्याकडून मोठ्या ड्रममध्ये हिरव्या रंगाच्या पाण्यात पांढरे वाटाणे बुडवून त्यांचा रंग बदलला जात होता. विशेष म्हणजे हा प्रकार सार्वजनिक शौचालयाच्या शेजारीच सुरू असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
 

peas 
 
 
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी फेरीवाल्याकडे याबाबत विचारणा केली. त्यानंतर पोलिसांनाही या प्रकाराची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्राथमिक चौकशी सुरू केली आहे. वाटाण्यांना हिरवा रंग देण्यासाठी नेमके कोणते रसायन किंवा रंग वापरण्यात आला होता आणि तो मानवी आरोग्यासाठी सुरक्षित आहे की नाही, याचा तपास केला जात आहे.कांदिवलीतील या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. रस्त्यावरील खाद्यपदार्थांची विक्री करताना स्वच्छता आणि अन्नसुरक्षेच्या नियमांचे पालन केले जाते की नाही, यावरून पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत. संबंधित फेरीवाल्यावर कठोर कारवाई करण्याबरोबरच अन्न व औषध प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन वापरण्यात आलेल्या रंगाचे नमुने तपासावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
 
 
 
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर शहरातूनही खाद्यपदार्थांच्या दर्जाबाबत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मिठाईच्या दुकानातून खरेदी केलेल्या कचोरीमध्ये डझनभर उंदराच्या लेंड्या आढळल्याचा दावा करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. एका ग्राहकाने कचोरी सेंटरमधून पाच कचोऱ्या खरेदी केल्या होत्या. घरी नेल्यानंतर कचोरी उघडली असता पाचही कचोऱ्यांमध्ये उंदराच्या लेंड्या आढळल्याचे त्याने सांगितले. यातील दोन कचोऱ्या मुलांनी खाल्ल्याचाही ग्राहकाचा आरोप आहे. या प्रकारामुळे खाद्यपदार्थ तयार करण्याच्या ठिकाणी स्वच्छतेचे निकष कितपत पाळले जातात, याबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.