नवी दिल्ली,
Warning about climate change जगभरातील हवामानाच्या पद्धतीत वेगाने बदल होत असून, एका बाजूला तीव्र उष्णतेच्या लाटा तर दुसरीकडे मुसळधार पाऊस, पूर आणि भूस्खलनाच्या घटना वाढताना दिसत आहेत. हवामान बदलासोबतच सध्या तीव्र होत असलेल्या एल निनोचा परिणामही या परिस्थितीवर होत असल्याचे सांगितले जात आहे.या बदलत्या परिस्थितीत महासागरांच्या वाढत्या तापमानाने शास्त्रज्ञांची चिंता वाढवली आहे. २२ ऑगस्ट २०२६ रोजी जगातील महासागरांच्या पृष्ठभागाचे सरासरी तापमान २१.१ अंश सेल्सिअसवर पोहोचले. १९७९ मध्ये नोंदी सुरू झाल्यापासूनची ही सर्वाधिक दैनिक पातळी आहे. यापूर्वी मार्च २०२४ मध्ये २१.०९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती.

पृथ्वीवर निर्माण होणाऱ्या अतिरिक्त उष्णतेचा मोठा हिस्सा महासागर शोषून घेतात. त्यामुळे समुद्राचे तापमान वाढल्याचा परिणाम केवळ सागरी जीवसृष्टीवर होत नाही, तर संपूर्ण हवामान व्यवस्थेवरही होऊ शकतो. समुद्राचे पाणी अधिक गरम झाल्याने बाष्पीभवन वाढते आणि वातावरणात मोठ्या प्रमाणात आर्द्रता जाऊ शकते. परिणामी काही भागांमध्ये अतिवृष्टी, पूर आणि वादळांची तीव्रता वाढण्याची शक्यता असते. वाढत्या तापमानाचा मासे, प्रवाळ आणि अन्य सागरी जीवांवरही परिणाम होऊ शकतो.दरम्यान, जग सध्या तीव्र एल निनोच्या प्रभावाखाली असल्याचे सांगितले जात आहे. अमेरिकेच्या NOAA च्या ऑगस्टमधील अंदाजानुसार, २०२६ च्या अखेरपर्यंत एल निनो आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर २०२६ या कालावधीत अत्यंत तीव्र एल निनोची शक्यता ९० टक्क्यांहून अधिक आहे. त्याच काळात ऐतिहासिकदृष्ट्या तीव्र एल निनोची घटना घडण्याची शक्यता ६९ टक्के असल्याचे NOAA च्या मूल्यांकनात नमूद करण्यात आले आहे.
वैज्ञानिक मॉडेल्सनुसार सध्याचा एल निनो ऑक्टोबर २०२६ ते जानेवारी २०२७ दरम्यान सर्वोच्च तीव्रतेवर पोहोचू शकतो. त्याची तीव्रता यापूर्वी नोंद झालेल्या सर्वाधिक शक्तिशाली एल निनो घटनांच्या जवळपास जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.भारतातही यंदाच्या मान्सूनमध्ये अनेक भागांना अतिवृष्टी, ढगफुटी, पूर आणि भूस्खलनाचा फटका बसला आहे. हिमाचल प्रदेशातील परिस्थिती त्याचे ठळक उदाहरण ठरली आहे. ३० जून ते २३ ऑगस्ट या कालावधीत राज्यात २२४ जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी ९१ मृत्यू भूस्खलन, ढगफुटी आणि बुडण्यासारख्या पावसाशी संबंधित घटनांमध्ये झाले. मान्सूनच्या काळात राज्यातील १४९ रस्ते बंद झाले असून, एकूण नुकसान १,१२१ कोटी रुपयांपेक्षा अधिक झाले आहे. दुसरीकडे, भारतातील काही भाग अतिवृष्टी आणि पुराचा सामना करत असताना युरोपातील अनेक देशांना उष्णतेच्या लाटांचा सामना करावा लागत आहे. २०२६ च्या उन्हाळ्यात युरोपमध्ये अनेक विक्रमी उष्णतेच्या लाटा नोंदल्या गेल्या. अलीकडील अंदाजानुसार, सलग चार मोठ्या उष्णतेच्या लाटांमुळे युरोपमध्ये किमान ३५,००० अतिरिक्त मृत्यू झाले असावेत. जर्मनी, फ्रान्स आणि स्पेन या तीन देशांमध्येच २५,००० हून अधिक अतिरिक्त मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. मात्र, ही आकडेवारी प्राथमिक असून ऑगस्ट महिन्याची संपूर्ण माहिती अद्याप अनेक देशांकडून समोर आलेली नाही.