लॉयड्स मेटल्सच्या पॉवर प्लांटमध्ये वेल्डरचा मृत्यू

उंचावरून काम करताना पडला, कंपनीतील सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह

    दिनांक :25-Aug-2026
Total Views |
चंद्रपूर
welder-dies-at-lloyds-metals घुग्गुस येथील लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडमधील नवीन पॉवर प्लांटच्या विस्तार प्रकल्पात काम करताना उंचावरून खाली पडून कंत्राटी वेल्डरचा मृत्यू झाला. 24 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेमुळे कंपनीतील कामगारांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. हरेंद्र राम (37) असे मृत वेल्डरचे नाव असून, ते एमसीके कुट्टी इंजिनिअरिंग या आऊटसोर्सिंग कंत्राटदार कंपनीमार्फत कार्यरत होते.

chanda 
 
नवीन पॉवर प्लांटमध्ये उंचावर वेल्डिंगचे काम सुरू असताना तोल जाऊन हरेंद्र राम खाली कोसळले. गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. 25 ऑगस्ट रोजी चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. उंचावर काम करताना आवश्यक असणारे सेफ्टी बेल्ट, सुरक्षा जाळी आणि इतर प्रतिबंधात्मक उपाय उपलब्ध करून दिले होते की नाही, याची कसून चौकशी करण्याची मागणी आता होत आहे.
 
या अपघातानंतर लॉयड्स मेटल्सच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी प्लांटला भेट दिल्याची माहिती असली, तरी याप्रकरणी संबंधित कंत्राटदारावर एफआयआर दाखल झाला आहे का आणि कंपनीकडून काय कारवाई झाली, याबाबत अद्याप कंपनीने काहीच माहिती दिलेली नाही. या अपघाताची निष्पक्ष चौकशी करून सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणार्‍या कंत्राटदारावर व जबाबदार अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करावी आणि मृतक हरेंद्र राम यांच्या कुटुंबाला तात्काळ योग्य ती आर्थिक भरपाई देण्यात यावी, अशी मागणी कामगार व स्थानिक नागरिकांमधून केली जात आहे.