वर्धा
literary-conference साहित्य संमेलन उत्सवी असते. परंतु, विश्वव्यापी भाषेच्या वर्तुळात अशी शतकाची सातत्यपूर्ण संमेलने आयोजित करण्याची दुसरीकडे परंपरा नाही. आता नव्या युगाची आव्हाने कवेत घेत, नवे तंत्रज्ञान आत्मसात करणारे नवे लेखक-विचार पुढे येत आहेत. त्यांना या उंबरठ्यावर घेऊनच, नव्हे तर तो ओलांडून पुढे जाण्याचे बळ संमेलने देऊ शकले पाहिजे. यादृष्टीने नियोजित शंभरावे संमेलन एक टाकलेले दमदार पाऊल असेल, असे प्रतिपादन अ. भा. मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष आणि अभिनेते योगेश सोमण यांनी केले.
स्थानिक लोक महाविद्यालयात विदर्भ साहित्य संघ वर्धा शाखा, लोकशिक्षण प्रसारक मंडळ व यशवंतराव दाते स्मृती संस्था यांच्या वतीने आयोजित विशेष बैठक व सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी महामंडळाचे कोषाध्यक्ष गझलकार प्रदीप निफाडकर, राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. गजानन कोठेवार, विदर्भ साहित्य संघाचे माजी अध्यक्ष प्रदीप दाते आणि वि. सा. संघाचे शाखाध्यक्ष डॉ. राजेंद्र मुंढे उपस्थित होते.
सोमण पुढे म्हणाले, राज्य शासन आणि मसाप पुणे यांच्या पुढाकारातून १०० व्या संमेलनापूर्वी महाराष्ट्र व बृहन्महाराष्ट्रात ९९ संमेलनाची ‘नांदी संमेलने’ आयोजित केली जाणार आहेत. यातील एक संमेलन वर्धेत १३ नोव्हेंबर रोजी ‘विनोबा यांचे जीवन आणि साहित्य विचार’ या विशेष विषयावर होईल. १०० व्या संमेलनाला आजपर्यंत एकाही साहित्य संमेलनास उपस्थित नसलेल्या परंतु साहित्यिक असलेल्या १०० जणांना एसटीने ने-आणणे आणि राहण्याची व्यवस्था केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रदीप दाते यांनी गांधी- विनोबांच्या या भूमीत त्यांच्या विचार साहित्याची मोठी परंपरा आहे. विनोबांच्या जीवनावर होणारे नांदी संमेलन एक आगळे वेगळे ठरेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. प्रदीप निफाडकर यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ. राजेंद्र मुंढे तर संचालन रंजना दाते यांनी केले. आभार प्रा. उल्हास लोहकरे यांनी मानले.