देशात सरासरीच्या १३ टक्के कमी पाऊस

मान्सून अंतिम टप्प्यात, ३५ टक्के भागांत कमी पर्जन्यमान

    दिनांक :26-Aug-2026
Total Views |
नवी दिल्ली,
13 less rainfall than average in the country नैऋत्य मान्सून आता अंतिम टप्प्यात आहे़ परंतु अनेक भागांमध्ये अद्यापही पुरेसा पाऊस झालेला नाही़ १ जून ते २४ ऑगस्ट या कालावधीत देशात ५५४.२ मिमी पाऊस झाला़ ताे या कालावधीतील सरासरीपेक्षा सुमारे १३ टक्के कमी आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली. भारतीय हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, देशाच्या सुमारे ३५ टक्के भागात पाऊस सरासरीपेक्षा कमी झाला आहे. अंदाजे ४१२ जिल्ह्यांमध्ये सामान्यपेक्षा कमी पावसाची नाेंद झाली आहे. यात १४ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांधील जिल्ह्यांचा समावेश आहे़ प्रामुख्याने दक्षिण भारत, ईशान्य, पूर्व आणि वायव्य भारतातील अनेक भागांमध्ये अत्यल्प पर्जन्यमान झाले आहे. काही भागांत अतिवृष्टी झाली आहे. परिणामी, काही भागांमध्ये महापूर, तर इतर भाग अपुऱ्या पावसामुळे त्रस्त आहेत.
 
 
13 less rainfall than average in the country
 
१ जून ते २४ ऑगस्ट दरम्यान, मेघालयात सरासरीपेक्षा ५८ टक्के कमी पाऊस झाला. म्हणजेच येथे केवळ ४२ टक्के पाऊस झाला़ याप्रमाणेच बिहार व मणिपूरमध्ये ४२ टक्के, अरुणाचल प्रदेशात ४० टक्के तर आंध्र प्रदेशात ३९ टक्के, गोवा आणि पंजाबमध्ये ३३ टक्के, पुदुचेरीमध्ये ३२ टक्के, आसाममध्ये २४ टक्के, केरळमध्ये २३ टक्के, राजस्थान आणि कर्नाटकमध्येही २२ टक्के आणि मिझोरममध्ये २१ टक्के कमी पाऊस झाला आहे. गोव्यात सहसा अतिवृष्टी होते. २४ ऑगस्टपर्यंत सरासरी २,५६२ मिमी पाऊस व्हायला हवा होता, परंतु यावेळी केवळ १,७१३.२ मिमी पावसाची नोंद झाली़ केरळमध्ये या कालावधीत सरासरी पर्जन्यमान १,६७१.४ मिमी असते़, परंतु यावेळी १,२८३.३ मिमी पाऊस झाला आहे़
 
आसाममध्ये पूर, १९ जिल्ह्यांमध्ये तुटवडा
आसाममध्ये नुकताच मोठा पूर आला होता. असे असूनही राज्यातील ३५ पैकी १९ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे़ काही भागांतील मुसळधार पाऊस एकूण पावसातील तूट भरून काढू शकला नाही. अशीच तफावत मेघालयातही दिसून आली. राज्यातील एकूण पाऊस सरासरीपेक्षा ५८ टक्के कमी होता. तथापि, नैऋत्येकडील खासी हिल्स जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. उर्वरित १० जिल्ह्यांमध्ये अत्यल्प पावसाची नाेंद झाली आहे़ बिहार आणि आंध्रप्रदेशातही मान्सून कमकुवत ठरला आहे़ मात्र, ओडिशाच्या सर्व ३० जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे.
 
२९ ऑगस्टपर्यंत अनेक भागांत पावसाची शक्यता
भारतीय हवामान विभागानुसार, झारखंडवरील कमी दाबाचे क्षेत्र आता वायव्येकडे सरकेल. परिणामी, पश्चिम उत्तरप्रदेश, पश्चिम मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये २९ ऑगस्टपर्यंत पाऊस पडू शकतो. तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, गोवा, केरळ, किनारपट्टीवरील आंध्रप्रदेश आणि गुजरातमध्येही महिन्याच्या अखेरपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे़