सरगोधानंतर स्कार्दूवरही भारताचा निशाणा

    दिनांक :26-Aug-2026
Total Views |
नवी दिल्ली,
sargodha ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने पाकिस्तानच्या सरगोधा हवाई तळावर कारवाई केल्यानंतर स्कार्दू हवाई तळालाही लक्ष्य करण्याची योजना आखली होती, असा मोठा खुलासा माजी संरक्षण प्रमुख जनरल अनिल चौहान यांनी केला आहे. मात्र, खराब हवामानामुळे भारतीय सैन्याला ही योजना बदलावी लागली आणि स्कार्दूऐवजी भोलारीकडे मार्ग वळवावा लागला. विवेकानंद इंटरनॅशनल फाउंडेशनमध्ये ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतरच्या घडामोडींवर बोलताना चौहान यांनी या कारवाईची माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, कारवाईदरम्यान भारतीय सैन्याने गिलगिट-बाल्टिस्तानमधील स्कार्दूला संभाव्य लक्ष्य म्हणून निश्चित केले होते. मात्र, हवामान अचानक खराब झाल्याने नियोजित कारवाईचा मार्ग बदलण्यात आला.

sargodha
चौहान यांनी सांगितले की, पाकिस्तानकडून सकाळी सुमारे १० वाजता चर्चा करण्याची इच्छा व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर हवाई दलाच्या प्रमुखांनी सरगोधावर हल्ला करण्याबाबत विचारणा केली. त्याला होकार देताना आणखी दोन लक्ष्ये निश्चित करण्यास सांगण्यात आले. त्यापैकी एक लक्ष्य स्कार्दू होते. त्यासाठी परवानगी देण्यात आली होती, मात्र नंतर हवामान बिघडल्याने मोहिमेचा मार्ग बदलून भोलारीकडे जावे लागले. दरम्यान, पाकिस्तानमधील किराणा टेकड्यांवर भारताने हल्ला केल्याच्या चर्चेलाही चौहान यांनी स्पष्टपणे नकार दिला. किराणा टेकड्यांचा परिसर पाकिस्तानच्या अणुसुविधांशी संबंधित असल्याचे सांगितले जाते. तत्कालीन हवाई दलाचे महासंचालक एअर मार्शल ए. के. भारती यांनी १२ मे रोजी किराणा टेकड्यांवर हल्ला करण्यात आला नसल्याचे सांगितले होते. चौहान यांनी भारती यांच्या या भूमिकेचे समर्थन केले.
चौहान यांनी स्पष्ट केले की, भारतीय लष्कराचे लक्ष्य किराणा टेकड्या नव्हते. मात्र, सरगोधाला लक्ष्य करण्यापूर्वी भारतीय सैन्याने त्या परिसरात मोठ्या प्रमाणावर लॉयटरिंग म्युनिशन्स पाठवली होती. ही स्फोटके हवेत काही काळ घिरट्या घालत लक्ष्याचा शोध घेण्यासाठी वापरली जातात. किराणा हिल्स हे सरगोधाच्या उत्तरेला सुमारे १० किलोमीटर अंतरावर आहे. चौहान यांच्या माहितीनुसार, या लॉयटरिंग म्युनिशन्सकडून सरगोधा आणि आसपासच्या भागातील रडारचा शोध घेतला जात होता. अशा स्फोटकांचा हवेत राहण्याचा कालावधी सुमारे दोन तास असतो. या काळात लक्ष्य सापडले नाही तर ते खाली येऊन कुठेतरी आदळते. या खुलाशामुळे ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने पाकिस्तानविरोधात आखलेल्या लष्करी कारवाईतील लक्ष्य आणि नियोजनाबाबत नवी माहिती समोर आली आहे.