चंद्रपूर
bogus-degrees ‘फेक सर्टिफिकेट रॅकेट’ प्रकरणाने संपूर्ण शैक्षणिक व प्रशासकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून, दुर्गापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार उघडकीस आला आहे. नामांकित विद्यापीठांची बनावट प्रमाणपत्रे, मार्कशीट व पदव्या तयार केल्या जात असून, त्यासाठी उमेदवारांकडून 5 ते 10 लाख रुपये उकळले जात होते. दुर्गापूर पोलिसांनी तुकुम येथील आरोपीविरुद्ध फसवणुकीसह बनावट कागदपत्रे तयार केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
नोकरी, महाविद्यालयातील प्रवेश आणि पदोन्नती मिळवून देण्याच्या नावाखाली 5 ते 10 लाख रुपयांना नामांकित विद्यापीठांची बोगस प्रमाणपत्रे, मार्कशीट व पदव्या विकणार्या एका मोठ्या रॅकेटचा चंद्रपूरमध्ये पर्दाफाश झाला आहे. याप्रकरणी दुर्गापूर पोलिसांनी तुकुम परिसरातील रहिवासी आरोपी परिमल बाबुराव गौरकर याच्याविरुद्ध फसवणूक आणि बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
चंद्रपूर शहरातील तुकुम येथील चिंतामणी अपार्टमेंटमध्ये राहणारे वैभव गणपत माशीरकर हे एका खासगी कंपनीत कार्यरत आहेत. त्यांच्याच परिसरात राहणारा आरोपी परिमल बाबुराव गौरकर (32) याने जानेवारी 2026 मध्ये फिर्यादी वैभव माशीरकर यांना फोन करून, आपल्या वडिलांकडून कारची चाबी घेऊन गाडीतील कापडी थैली घरात सुरक्षित ठेवण्यास सांगितले होते. शेजारी असल्याने माशीरकर यांनी ती थैली काढून स्वतःच्या घरात ठेवली. त्यानंतर काही दिवसांनी परिमल गौरकर याने त्या थैलीतून काही प्रमाणपत्रे काढून नेली. पुन्हा काही दिवसांनी तो आणखी प्रमाणपत्रे नेण्यासाठी आला असता, माशीरकर यांनी या कागदपत्रांबद्दल विचारणा केली. त्यावेळी आरोपी गौरकर याने कोणाला नोकरी मिळवण्यासाठी, अॅडमिशनसाठी किंवा प्रमोशनसाठी पदवी, डिप्लोमा, टीसी व मार्कशीट लागत असल्यास संबंधितांकडून गरजेनुसार 5 ते 10 लाख रुपये घेऊन आपण ही प्रमाणपत्रे तयार करून देत असल्याची धक्कादायक कबुली दिली.
त्यानंतर माशीरकर यांनी त्या थैलीची पाहणी केली असता, त्यामध्ये संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, सोलापूर विद्यापीठ, श्रीधर युनिव्हर्सिटी (पिलानी, राजस्थान), गोंडवाना विद्यापीठ (गडचिरोली) आणि छत्रपती शाहूजी महाराज युनिव्हर्सिटी (कानपूर) या नामांकित विद्यापीठांच्या सेमिस्टरच्या बनावट मार्कशीट्स, डिप्लोमा प्रमाणपत्रे व मायग्रेशन सर्टिफिकेट्स मोठ्या प्रमाणावर आढळून आले. या सर्व प्रमाणपत्रांवर विद्यापीठांचे बनावट शिक्के आणि खोट्या स्वाक्षर्या मारून ती तयार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. ही सर्व बनावट प्रमाणपत्रे स्वतःच्या घरात असल्याने आणि आरोपी बर्याच दिवसांपासून ती थैली परत नेण्यासाठी न आल्याने अखेर फिर्यादी यांनी कायदेशीर कारवाईसाठी दुर्गापूर पोलिस ठाण्यात धाव घेऊन संपूर्ण हकीकत कथन केली.
या बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे अनेकांनी खासगी तसेच शासकीय नोकर्या मिळवून शासन व कंपन्यांची मोठी दिशाभूल आणि फसवणूक केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. फिर्यादी वैभव माशीरकर यांच्या तक्रारीवरून दुर्गापूर पोलिसांनी आरोपी परिमल गौरकर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) 2023 मधील कलम 318(4) (फसवणूक), 336(3) (बनावट दस्तऐवज तयार करणे) आणि 340(2) (बनावट दस्तऐवज खरे म्हणून वापरणे) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलिस निरीक्षक संतोष शेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रवींद्र नक्कनवार या बोगस प्रमाणपत्र रॅकेटचा पुढील सखोल तपास करत आहेत.