सीआयडी’ बंद होण्यामागे अंतर्गत राजकारण

दयानंद शेट्टींचा मोठा खुलासा, लता मंगेशकरांनीही घेतला होता पुढाकार

    दिनांक :26-Aug-2026
Total Views |
मुंबई
cid टेलिव्हिजनच्या दुनियेत दररोज नवनवीन मालिकांची सुरुवात होते; मात्र यातील मोजक्याच मालिका प्रेक्षकांच्या मनात कायमचे स्थान निर्माण करतात. शिवाजी साटम, दिनेश फडणीस, आदित्य श्रीवास्तव आणि दयानंद शेट्टी यांच्या प्रमुख भूमिका असलेली ‘सीआयडी’ ही अशीच एक लोकप्रिय मालिका ठरली. १९९८ मध्ये सुरू झालेल्या या क्राईम ड्रामाने २०१८ पर्यंत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. २०२४ मध्ये ही लोकप्रिय मालिका पुन्हा छोट्या पडद्यावर परतल्याने चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, आठ वर्षांपूर्वी मालिका बंद झाल्यानंतर तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. ही मालिका नेमकी का बंद करण्यात आली, हा प्रश्नही अनेकांच्या मनात होता. आता दयानंद शेट्टी यांनी २०१८ मध्ये ‘सीआयडी’ बंद होण्यामागचे कारण स्पष्ट केले आहे.
 

cid show ending revealed: dayanand shetty explains why the iconic crime show was shut down 
सिद्धार्थ कनन यांना दिलेल्या मुलाखतीत दयानंद शेट्टी यांनी या मालिकेच्या बंद होण्यामागील घटनाक्रम सांगितला. त्यांच्या मते, ‘सीआयडी’ बंद होण्यामागे अंतर्गत राजकारण कारणीभूत होते. या समस्येला २०१६ मध्ये सुरुवात झाली होती. चॅनेलला मालिकेचा निर्माता बदलायचा होता; मात्र मालिकेतील कलाकार त्यासाठी तयार नव्हते.दयानंद शेट्टी यांनी सांगितले की, कलाकारांचा निर्माता आणि एकमेकांशी अतिशय जवळचा आणि विश्वासाचा संबंध होता. कलाकारांनी निर्मात्याला इतके स्वीकारले होते की त्यांच्यामध्ये कधी औपचारिक करारही झाला नव्हता. तब्बल २१ वर्षे ते एकत्र काम करत होते. चॅनेलपेक्षा ते ‘फायरवर्क्स’चे कलाकार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे अचानक चॅनेलने निर्माता बदलण्याचा निर्णय घेतल्याने कलाकारांना हा निर्णय अजिबात मान्य झाला नाही. कलाकारांनी या निर्णयाला विरोध केला आणि अखेर त्यातूनच मालिका बंद झाली.
याच काळात दिवंगत ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांनी ‘सीआयडी’साठी पुढाकार घेतल्याचेही दयानंद शेट्टी यांनी सांगितले. त्या या मालिकेच्या मोठ्या चाहत्या होत्या आणि कलाकारांनाही त्यांचा मोठा पाठिंबा होता. मालिका बंद होणार असल्याचे समजल्यानंतर त्यांनी त्याविरोधात आवाज उठवला. इतकेच नव्हे, तर त्यांनी ‘सोनी अमेरिका’शी संपर्क साधून मालिकेच्या बंद होण्याबाबत नाराजी व्यक्त केली होती. ‘मी हा शो पाहते आणि तुम्ही तो बंद करत आहात. तुम्हाला अडचण काय आहे?’ अशा शब्दांत त्यांनी संबंधितांना जाब विचारल्याचे दयानंद यांनी सांगितले.दरम्यान, २०२४ मध्ये ‘सीआयडी’ पुन्हा सुरू करण्यात आली. नव्या पर्वात काही महिन्यांनंतर अभिनेता पार्थ समथान याचीही एंट्री झाली होती. मात्र, अवघ्या एका महिन्यातच पार्थने या मालिकेला अलविदा केला. त्याने स्वतः मालिकेतून बाहेर पडल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे ‘सीआयडी’च्या नव्या पर्वाबाबतही प्रेक्षकांमध्ये चर्चा रंगली होती.