भारताविरुद्ध दिनुशाचा ऐतिहासिक पराक्रम!

    दिनांक :26-Aug-2026
Total Views |
कोलंबो,
dinushas historic feat against india भारताविरुद्धची कसोटी मालिका श्रीलंकेच्या युवा फलंदाज सोनल दिनुशासाठी विशेष ठरत आहे. मालिकेतील दुसऱ्या कसोटीतही त्याने दमदार फलंदाजी करत आपली छाप पाडली. कोलंबो येथे सुरू असलेल्या सामन्याच्या तिसऱ्या दिवसअखेर दिनुशा १३७ चेंडूंमध्ये ८५ धावांवर नाबाद राहिला. या खेळीसह त्याने कसोटी क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध पहिल्या तीन डावांमध्ये ८० किंवा त्याहून अधिक धावा करण्याचा उल्लेखनीय विक्रम नोंदवला. भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीत दिनुशाने पहिल्या डावात शतक झळकावले होते, तर दुसऱ्या डावात त्याने ८४ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. आता दुसऱ्या कसोटीतही त्याने ८५ धावांपर्यंत मजल मारली आहे. या कामगिरीमुळे गेल्या ४८ वर्षांत भारताविरुद्धच्या पहिल्या तीन कसोटी डावांमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे.

dinusha
दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा श्रीलंकेने ८ गडी गमावून २६५ धावा केल्या होत्या. मात्र, भारताने पहिल्या डावात ५०३ धावांवर ८ गडी गमावून डाव घोषित केला असल्याने श्रीलंका अजूनही २३८ धावांनी पिछाडीवर आहे. दिनुशाच्या या कामगिरीने त्याला कसोटी क्रिकेटमधील दिग्गज फलंदाजांच्या विशेष यादीत स्थान मिळवून दिले आहे. भारताविरुद्धच्या पहिल्या तीन कसोटी डावांमध्ये ८० किंवा त्याहून अधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये यापूर्वी इंग्लंडचे एव्हर्टन वीक्स आणि पाकिस्तानचे महान फलंदाज झहीर अब्बास यांचा समावेश होता.
एव्हर्टन वीक्स यांनी १९४८ मध्ये भारताविरुद्धच्या पहिल्या तीन कसोटी डावांमध्ये अनुक्रमे १२८, १९४ आणि १६२ धावा केल्या होत्या. त्यानंतर झहीर अब्बास यांनी १९७८ मध्ये १७६, ९६ आणि नाबाद २३५ धावांची खेळी केली होती. आता २०२६ मध्ये दिनुशाने १००, ८४ आणि नाबाद ८५ धावांसह या खास यादीत प्रवेश केला आहे. दिनुशाकडे आता चौथ्या दिवशी शतक पूर्ण करण्याची संधी आहे. तो सध्या शतकापासून केवळ १५ धावा दूर आहे. भारताविरुद्धच्या पहिल्या तीन कसोटी डावांमध्ये अर्धशतक झळकावणारा तो श्रीलंकेचा दुसरा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी १९८२ मध्ये दुलीप मेंडिस यांनी अशी कामगिरी केली होती. विशेष म्हणजे भारताविरुद्धच्या या मालिकेपूर्वी दिनुशाने श्रीलंकेकडून केवळ तीन कसोटी सामने खेळले होते. गेल्या वर्षी वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेतही त्याने आपली फलंदाजीची क्षमता दाखवली होती. त्या मालिकेतील दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात त्याने ९३ धावांची खेळी केली होती.