गोंदिया
forest-gambling-den शहरालगतच्या ईरी येथील झुडपी जंगलात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी रात्री धाड टाकून जुगार खेळणार्या १२ जणांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत रोख रकमेसह १४ मोबाईल, दुचाकी, चारचाकी वाहन व जुगाराचे साहित्य असा तब्बल १२ लाख ४ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जुगार अड्डा चालविणार्या चौघांची नावेही चौकशीत निष्पन्न झाली असून, एकूण १९ जणांविरुद्ध गोंदिया ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांच्या निर्देशानुसार एलसीबीचे पोलिस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात कारवाईसाठी पेट्रोलिंग करीत असताना ईरी येथील झुडपी जंगल परिसरात काही इसम ५२ पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हार-जीतचा जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली. माहितीच्या आधारे मंगळवारी रात्री सुमारे ११ वाजता पथकाने जुगार अड्ड्यावर छापा टाकला.
या कारवाईत मोहित दीपक साखरे, नितेश राजू बागडे, दिनेश ऊर्फ राहुल राजकुमार चतुर्वेदी, डोहेल कमलकुमार बारे, मधुकर धनिराम गोंडाणे, शिवकुमार टेकलाल लिल्हारे, मुकेश भागवत भोंडेकर, विलास घनश्याम मानकर, प्रलय सुभाष मेश्राम, आकाश दिलीप भिमटे, विक्की राजू मस्करे आणि आशिष सुखदेव उके हे १२ जण जुगार खेळताना आढळून आले. त्यांच्याकडून ६८ हजार ३०० रुपये रोख, ७० हजार रुपये किमतीच्या दुचाकी, २ लाख ६१ हजार रुपये किमतीचे १४ मोबाईल, ८ लाख रुपये किमतीचे चारचाकी वाहन तसेच जुगाराचे साहित्य असा एकूण १२ लाख ४ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दरम्यान, पोलिसांची चाहूल लागताच निलेश उके, विवेक रहीले आणि अभय विजय बारई हे तिघे घटनास्थळावरून पसार झाले. ताब्यातील आरोपींची चौकशी केली असता किसन रमेश दमाहे, मुकेश ऊर्फ बल्ला भगवानदास बिरीया, सतीश तेजराम मेन्ढे आणि जितु मोहनसिंग पारासर हे चौघे मिळून जुगाराचा अड्डा चालवत असल्याचे समोर आले. या प्रकरणी पोलिस हवालदार संजय चव्हाण यांच्या तक्रारीवरून गोंदिया ग्रामीण पोलिस ठाण्यात महाराष्ट्र (मुंबई) जुगार प्रतिबंधक अधिनियम, १८८७ अन्वये १९ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास गोंदिया ग्रामीण पोलिस करीत आहेत.