मुंबई
kriti sanon ज्वेलरी ब्रँड GIVA ने रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध केलेली अभिनेत्री कृति सेनन हिची जाहिरात सोशल मीडियावरील तीव्र टीकेनंतर अखेर सर्व मीडिया प्लॅटफॉर्मवरून हटवली आहे. कृतिच्या जाहिरातीतील पोशाखावरून सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला होता. या वादाला उधाण आल्यानंतर आणि विविध स्तरांतून टीका झाल्यानंतर कंपनीने हे व्यावसायिक अभियान मागे घेण्याचा निर्णय घेतला.
या जाहिरातीत कृति सेनन पारंपरिक पद्धतीने रक्षाबंधनाचा सण साजरा करताना दिसली होती. तिने ब्रालेट-शैलीतील ब्लाउज, ड्रेप्ड स्कर्ट आणि केप असा पोशाख परिधान केला होता. जाहिरात समोर आल्यानंतर सोशल मीडियावरील एका वर्गाने रक्षाबंधनासारख्या पारंपरिक आणि पवित्र सणाच्या निमित्ताने असा पोशाख निवडल्याबद्दल आक्षेप घेतला. या सांस्कृतिक उत्सवासाठी अधिक शालीन आणि पारंपरिक पोशाखाची निवड करायला हवी होती, असा युक्तिवाद अनेकांनी केला.
या वादात अभिनेत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या खासदार कंगना रनौत यांनीही प्रतिक्रिया दिल्यानंतर प्रकरण आणखी चिघळले. कंगना यांनी कृति सेननच्या पोशाखावर टीका करत रक्षाबंधनासारख्या पवित्र प्रसंगी तिच्या लूकची तुलना ‘बिकिनी’शी केली. त्यानंतर कृतिनेही आपल्या पोशाखाच्या निवडीचे समर्थन करत टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिले. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कृतिच्या बचावासाठी भूमिका मांडली. महिलांनी काय परिधान करावे आणि काय करू नये, याचा निर्णय घेण्याचा अधिकार त्यांचा स्वतःचा आहे, असे त्यांनी म्हटले होते. मात्र, त्यानंतरही सोशल मीडियावरील वाद शमण्याऐवजी अधिकच तीव्र झाला.
विवाद वाढत असल्याचे लक्षात आल्यानंतर GIVA ने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर निवेदन प्रसिद्ध करून भूमिका स्पष्ट केली. रक्षाबंधनातील प्रेम आणि उत्सवाची भावना कुटुंबातील पाळीव प्राण्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने हे अभियान तयार करण्यात आले होते, असे ब्रँडने स्पष्ट केले. कोणत्याही व्यक्तीच्या किंवा समाजातील कोणत्याही वर्गाच्या धार्मिक अथवा सांस्कृतिक भावना दुखावण्याचा कंपनीचा हेतू नव्हता, असेही GIVA ने म्हटले.
भारतीय संस्कृती, परंपरा आणि सणांप्रती आपली निष्ठा असल्याचे सांगत कंपनीने कुटुंबासोबत आनंद वाटून घेण्यावर आपला नेहमीच विश्वास असल्याचे नमूद केले. या जाहिरातीमुळे अनवधानाने समाजातील कोणत्याही घटकाच्या भावना दुखावल्या असतील, तर त्याचा आदर करत आपण ही जाहिरात सर्व प्लॅटफॉर्मवरून पूर्णपणे मागे घेत असल्याचे कंपनीने जाहीर केले. त्यासोबतच GIVA ने सर्वांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देत सकारात्मकतेचा संदेशही दिला.
अशाप्रकारे कृति सेननच्या रक्षाबंधनातील पोशाखावरून सुरू झालेला वाद सोशल मीडियावर चांगलाच रंगला आणि अखेर ती जाहिरातच मागे घेण्याचा निर्णय GIVA ला घ्यावा लागला.