पहाटेच्या हादऱ्याने हिमाचल हादरले ५ जिल्ह्यांना भूकंप

    दिनांक :26-Aug-2026
Total Views |
शिमला
himachal pradesh earthquake हिमाचल प्रदेशात बुधवारी पहाटे भूकंपाच्या धक्क्यांनी नागरिकांची झोप उडाली. सकाळी ५ वाजून ४६ मिनिटांनी जाणवलेल्या या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.० इतकी नोंदवण्यात आली. सुदैवाने या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या (NCS) माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू शिमल्यापासून सुमारे ६६ किलोमीटर पूर्व-दक्षिण दिशेला, जमिनीखाली १० किलोमीटर खोलीवर होता.
 

himachal pradesh earthquake 4.0 magnitude tremor jolts 5 districts early morning 
भूकंपाचे धक्के सुमारे तीन सेकंद जाणवले. अचानक जमीन हादरल्याने अनेक नागरिक घाबरून घराबाहेर पडले आणि सुरक्षिततेसाठी मोकळ्या जागेत गेले. कंपन थांबल्यानंतर काही वेळाने परिस्थिती सामान्य झाल्याचे पाहून नागरिक पुन्हा घरात परतले.
शिमल्यासह सोलन, सिरमौर, बिलासपूर आणि मंडी जिल्ह्यांतील अनेक भागांतही भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती समोर आली आहे. सध्या या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्तहानी झाल्याची नोंद नाही. भूकंपाचा केंद्रबिंदू शिमल्याच्या पूर्व-दक्षिण दिशेला असल्याने जुब्बल-कोटखाई परिसराच्या दिशेने तो असल्याचे सांगण्यात येत आहे. हिमाचल प्रदेश हा भूकंपाच्या दृष्टीने संवेदनशील राज्यांपैकी एक असून, राज्यातील अनेक भाग भूकंपाच्या उच्च जोखमीच्या झोन-४ आणि झोन-५ मध्ये येतात.
तज्ज्ञांच्या मते, ५.० पेक्षा कमी तीव्रतेच्या भूकंपांमुळे सामान्यतः मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता कमी असते. मात्र, स्थानिक परिस्थिती आणि भूकंपाची खोली यानुसार त्याचा परिणाम वेगवेगळा असू शकतो. भूकंपाची तीव्रता वाढत गेल्यास नुकसानाचा धोकाही वाढतो.
दरम्यान, उत्तर भारतात अलीकडच्या काळात भूकंपाच्या हालचाली वाढल्याचे दिसून येत आहे. दोन दिवसांपूर्वी, सोमवारी सकाळी सुमारे ८ वाजून २५ मिनिटांनी लेह-लडाखमध्ये ३.५ रिश्टर तीव्रतेचा भूकंप झाला होता. त्याच्या आदल्या दिवशी याच भागात ४.६ रिश्टर तीव्रतेचा भूकंपाचा धक्काही जाणवला होता. त्यामुळे अलीकडच्या काळात या परिसरातील भूकंपीय हालचालींकडे लक्ष वेधले गेले आहे.
भूकंपाच्या तीव्रतेनुसार himachal pradesh earthquake त्याचा परिणामही बदलत जातो. २.० किंवा त्यापेक्षा कमी तीव्रतेच्या भूकंपांना सूक्ष्म भूकंप म्हटले जाते. त्यांचे धक्के अत्यंत सौम्य असल्याने अनेकदा ते नागरिकांना जाणवतही नाहीत. भूकंपप्रवण भागात अशा स्वरूपाचे धक्के वारंवार येत असतात. मात्र, ४.५ किंवा त्याहून अधिक तीव्रतेचे भूकंप स्पष्टपणे जाणवू शकतात आणि काही परिस्थितींमध्ये त्यातून जीवित तसेच वित्तहानी होण्याची शक्यता असते. त्यामुळे या तीव्रतेच्या भूकंपांकडेही दुर्लक्ष करता येत नाही; घरांना आणि इमारतींना नुकसान होण्याचा धोका असू शकतो.
दरम्यान, ७.० किंवा त्याहून अधिक तीव्रतेच्या भूकंपांना धोकादायक श्रेणीत मानले जाते. अशा भूकंपांमुळे मोठ्या प्रमाणावर विध्वंस होऊ शकतो. काही दिवसांपूर्वी कोलंबियात आलेल्या ७.४ रिश्टर तीव्रतेच्या भूकंपाने याची भीषणता दाखवून दिली होती. या भूकंपामुळे अनेक इमारती कोसळल्या आणि ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध घेताना बचाव पथकांसह नागरिक भावूक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. अनेक जण अद्याप बेपत्ता असून, मदत आणि बचावकार्य सुरू आहे.