चिमुकल्यांची नर्सरीच बनली मृत्यूचा सापळा!

    दिनांक :26-Aug-2026
Total Views |
इस्लामाबाद,
islamabad fire पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथील पाकिस्तान इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (PIMS) रुग्णालयात बुधवारी सकाळी भीषण आग लागून १५ नवजात बालकांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना रुग्णालयाच्या स्त्रीरोग विभागातील तिसऱ्या मजल्यावर असलेल्या नर्सरीत घडली. आगीच्या वेळी नर्सरीमध्ये १६ नवजात बालके होती. त्यापैकी केवळ एका बालकाला सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले.
 
islamabad fire
 
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास स्त्रीरोग विभागात अचानक आग लागली. काही वेळातच आगीने परिसराला वेढा दिल्याने रुग्णालयात एकच गोंधळ उडाला. बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. त्यानंतर अग्निशमन दलाकडून कुलिंग ऑपरेशन सुरू करण्यात आले. आगीचे कारण एसी कंप्रेसरच्या स्फोटाशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच बचावकार्यासाठी अग्निशमन दलाच्या सहा गाड्या आणि चार रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र, आगीत १५ नवजात बालकांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांचा आक्रोश सुरू होता.
 
घटनेनंतर स्थानिक प्रशासनाने प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. आगीचे नेमके कारण काय होते, रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेत काही त्रुटी होत्या का आणि दुर्घटनेमागे अन्य कोणते कारण आहे का, याचा तपास करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले असून तातडीने चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांच्या कार्यालयाने दिलेल्या निवेदनात नवजात बालकांच्या मृत्यूची पुष्टी करण्यात आली. मुलांशी संबंधित कोणतीही दुःखद घटना ही कधीही भरून न निघणारी हानी असल्याचे शरीफ यांनी म्हटले.
 
दरम्यान, १९८५ मध्ये बांधण्यात आलेले पाकिस्तान इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस हे इस्लामाबादमधील सर्वात मोठे आणि दुसरे सर्वात जुने सरकारी रुग्णालय आहे. यापूर्वी याच वर्षी जानेवारीमध्ये पाकिस्तानमधील कराची येथील एका शॉपिंग मॉलमध्ये भीषण आग लागली होती. या दुर्घटनेत अंदाजे १४ जणांचा मृत्यू झाला होता, तर अनेक जण जखमी झाले होते.