इस्लामाबाद
islamabad hospital fire पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथील पाकिस्तान इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (PIMS) या रुग्णालयाच्या स्त्रीरोग विभागात बुधवारी सकाळी भीषण आग लागून १५ नवजात बालकांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना गायनेकोलॉजी वॉर्डमध्ये घडली. आग लागली त्यावेळी वॉर्डमधील नर्सरीमध्ये १६ नवजात बालके होती. त्यापैकी केवळ एका बालकाला वाचवण्यात यश आले.

जिओ न्यूजच्या वृत्तानुसार, रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरील गायनेकोलॉजी विभागात सकाळी ७ वाजता आग लागण्यास सुरुवात झाली. आग पसरताच संपूर्ण रुग्णालय परिसरात एकच खळबळ उडाली. बचाव पथकांनी अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले असून, सध्या अग्निशमन दलाकडून कूलिंग ऑपरेशन सुरू आहे.आगीची माहिती मिळताच बचाव आणि मदतकार्यासाठी अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्याचबरोबर चार रुग्णवाहिकाही तैनात करण्यात आल्या. नवजात बालकांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिजनांचा आक्रोश सुरू आहे.या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे स्थानिक प्रशासनाने जाहीर केले आहे. प्रशासनाने यासाठी एक समिती स्थापन केली असून, आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली, घटना कोणत्या परिस्थितीत घडली आणि रुग्णालयाच्या सुरक्षा व्यवस्थेत काही त्रुटी किंवा निष्काळजीपणा झाला होता का, याचा तपास ही समिती करणार आहे.दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी सरकारी रुग्णालयातील आगीमुळे झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले असून, घटनेच्या तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत. पंतप्रधान कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात या अग्निकांडात नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी करण्यात आली आहे. शरीफ यांनी, “मुलांशी संबंधित कोणतीही दुःखद घटना ही भरून न निघणारी हानी असते,” असे म्हटले आहे.
पाकिस्तान इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (PIMS) या रुग्णालयाची स्थापना १९८५ मध्ये झाली होती. हे इस्लामाबादमधील सर्वात मोठे आणि दुसरे सर्वात जुने सरकारी रुग्णालय आहे.
दरम्यान, याच वर्षी जानेवारीमध्ये पाकिस्तानमधील कराची येथे एका शॉपिंग मॉलमध्ये भीषण आग लागली होती. या दुर्घटनेत आगीत होरपळून सुमारे १४ जणांचा मृत्यू झाला होता, तर डझनभर नागरिक जखमी झाले होते.