मुंबई
mpsc drug inspector exam paper leak महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) ड्रग इन्स्पेक्टर पदासाठी घेण्यात येणारी परीक्षा पेपर लीक झाल्याने रद्द करण्यात आली आहे. या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी आयोगाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. पेपर लीक करणारे नेटवर्क संपूर्ण महाराष्ट्रात सक्रिय असल्याचा दावा त्यांनी केला असून, ड्रग इन्स्पेक्टर परीक्षेचे पेपर तब्बल ४०-४० लाख रुपयांना विकण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना रोहित पवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला टॅग करत भूमिका मांडली. ते म्हणाले की, MPSC ने अखेर ड्रग इन्स्पेक्टर परीक्षेचा पेपर लीक झाल्यामुळे परीक्षा रद्द केली आहे. पेपर लीक झाल्याचे पुराव्यांसह प्रकरण यापूर्वीच उपस्थित केले होते आणि तपास यंत्रणांसोबत आवश्यक कारवाईही केली होती. अखेरच्या तपासात पेपर लीक झाल्याचे सिद्ध झाल्याचेही त्यांनी म्हटले.
मात्र, आयोगाने परीक्षा रद्द केली असली तरी पेपर केवळ एका विद्यार्थ्याकडे होता, असे सांगणे अजिबात स्वीकारार्ह नसल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे. त्यांच्या माहितीनुसार, संपूर्ण राज्यात कार्यरत असलेल्या एजंट रॅकेटच्या माध्यमातून पेपर ४०-४० लाख रुपयांना विकण्यात आले होते. या प्रकाराची माहिती आयोगालाही होती, असा गंभीर आरोप त्यांनी केला.या प्रकरणाची चौकशी अहवाल सार्वजनिक करण्याची मागणीही रोहित पवार यांनी केली आहे. प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करण्याऐवजी आयोगाने तपासाचा संपूर्ण अहवाल जनतेसमोर आणावा, अशी भूमिका त्यांनी घेतली. त्यांनी यापूर्वी दिलेल्या एजंटांच्या नावांचे पुढे काय झाले, याचे उत्तरही आयोगाने द्यावे, अशी मागणी केली. तसेच या प्रकरणात आयोगातील कोणी व्यक्ती सहभागी आहे का आणि हा संपूर्ण प्रकार कोणाच्या संरक्षणाखाली सुरू होता, हेही स्पष्ट करण्याची मागणी त्यांनी केली.
हे प्रकरण लपवण्याचा प्रयत्न झाल्यास आपण गप्प बसणार नाही, असा इशाराही रोहित पवार यांनी दिला आहे. MPSC मध्ये पेपर लीक होणे ही साधी घटना नसून अत्यंत गंभीर बाब आहे. हा थेट आयोगाच्या विश्वासार्हतेचा प्रश्न आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले. त्यामुळे आयोगाच्या अध्यक्षांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. सरकारनेही आयोगाच्या अध्यक्षपदी स्वच्छ प्रतिमेच्या व्यक्तीची नियुक्ती करावी, असे त्यांनी म्हटले.तसेच सामान्य प्रशासन विभागाच्या मंत्र्यांनीही सरकारची भूमिका स्पष्ट करून राज्यातील जनतेला या प्रकरणाचे सत्य सांगावे, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.