एमपीएससी पेपरफुटी प्रकरणात सहा जणांना अटक

२ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी, ड्रग इन्स्पेक्टर भरतीही रद्द

    दिनांक :26-Aug-2026
Total Views |
मुंबई
mpsc drug inspector paper महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक अर्थात ड्रग इन्स्पेक्टर (ग्रुप-ब) पदाच्या भरती परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने या प्रकरणात सहा जणांना अटक केली असून, सर्व आरोपींना मुंबईतील किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना २ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या सर्वांची गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे. दरम्यान, पेपरफुटीच्या तक्रारी आणि प्राथमिक तपासातील निष्कर्षांच्या पार्श्वभूमीवर MPSC ने खाद्य व औषध प्रशासन विभागातील ड्रग इन्स्पेक्टर (ग्रुप-ब) पदांची संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द केली असून, आता या पदांसाठी फेरपरीक्षा घेतली जाणार आहे.
 
mpsc drug inspector paper leak: 6 arrested, recruitment cancelled and re-exam announced
 
या प्रकरणात MPSCचे अंडर सेक्रेटरी अभिजीत लेंडवे यांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांच्यासह आयोगाचे दोन सहायक कक्ष अधिकारी गोपाळ मराठे आणि विश्वेश्वर नकाते यांनाही अटक करण्यात आली आहे. पेपरफुटीचा आरोप सर्वप्रथम करणाऱ्या गौरव पाटील याची भूमिकाही पोलिसांच्या तपासाच्या कक्षेत असून त्याच्याकडे संशयित म्हणून पाहिले जात आहे. याशिवाय परीक्षेला बसलेल्या ऋतुजा पाटीलचे वडील अमृत पाटील आणि पेपरफुटीचा कथित मास्टरमाइंड प्रवीण पाटील यांनाही अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात नेमकी पेपरफुटी कशी झाली आणि त्यामागे कोणाची भूमिका होती, याचा तपास सध्या सुरू आहे.
दरम्यान, MPSCला २२ ते २६ जुलैदरम्यान काही उमेदवार आणि लोकप्रतिनिधींकडून परीक्षेतील गैरप्रकाराबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. २२ मार्च २०२६ रोजी झालेल्या स्क्रीनिंग परीक्षेच्या सुमारे दोन दिवस आधी, म्हणजे २० मार्च रोजी काही उमेदवारांना प्रश्नपत्रिका किंवा त्यातील प्रश्न मिळाल्याचा आरोप या तक्रारींमध्ये करण्यात आला होता. हे प्रश्न सोशल मीडिया किंवा इतर डिजिटल माध्यमांतून प्रसारित झाल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले होते. तक्रारींचे गांभीर्य लक्षात घेऊन MPSCने २७ जुलै रोजी मुंबई पोलिसांकडे चौकशीची मागणी केली. त्यानंतर गुन्हे शाखेने प्राथमिक तपास करून आयोगाला अहवाल सादर केला. या अहवालानुसार, प्रथमदर्शनी एका उमेदवाराला परीक्षेपूर्वी प्रश्नांचा संच मिळाला होता आणि त्याचा त्याला फायदा झाल्याचे आढळून आले. मात्र, संपूर्ण प्रश्नपत्रिका फुटली किंवा अनेक उमेदवारांना त्याचा लाभ झाला, असे आयोगाने म्हटलेले नाही.
या पार्श्वभूमीवर MPSCने २५ ऑगस्ट रोजी ड्रग इन्स्पेक्टर (ग्रुप-ब) पदांची संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. परीक्षेची गोपनीयता, निष्पक्षता, पारदर्शकता आणि भरती प्रक्रियेवरील उमेदवारांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. आता या पदांसाठी नव्याने स्क्रीनिंग परीक्षा घेतली जाणार आहे. आधीच्या भरती प्रक्रियेत अर्ज केलेल्या उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता राहणार नाही. तसेच फेरपरीक्षेसाठी त्यांच्याकडून कोणतेही अतिरिक्त परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही. नव्या परीक्षेची तारीख आणि अन्य तपशील स्वतंत्रपणे जाहीर केले जाणार आहेत.
या भरती प्रक्रियेची सुरुवात २९ जुलै २०२५ रोजी झाली होती. MPSCने खाद्य व औषध प्रशासन विभागातील ड्रग इन्स्पेक्टर (ग्रुप-ब) पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यानंतर २२ मार्च २०२६ रोजी राज्यातील सहा विभागीय मुख्यालयांवर ऑफलाइन पद्धतीने स्क्रीनिंग परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल १२ जून रोजी जाहीर करण्यात आला आणि त्यानंतर ५०६ उमेदवारांना मुलाखतीसाठी पात्र ठरवण्यात आले.
या पात्र उमेदवारांच्या मुलाखती १ ते २२ जुलैदरम्यान घेण्यात आल्या. त्यापैकी ४८८ उमेदवार मुलाखतीला उपस्थित राहिले. मुलाखत प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर २२ जुलै रोजी ४८८ उमेदवारांची तात्पुरती सामान्य गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. त्यात ४८५ उमेदवार ड्रग इन्स्पेक्टर पदासाठी पात्र, तर तीन उमेदवार अपात्र ठरवण्यात आले होते. मात्र, त्यानंतर समोर आलेल्या पेपरफुटीच्या तक्रारींमुळे आता ही संपूर्ण प्रक्रिया पुन्हा परीक्षेच्या टप्प्यापासून सुरू करावी लागणार आहे.
विशेष म्हणजे, या कथित पेपरफुटीची तक्रार सुरुवातीला गौरव पाटील, लोकेश पाटील आणि ऋषिकेश गांगुर्डे या विद्यार्थ्यांनी ई-मेलद्वारे केली होती. २१ जुलै रोजीही MPSCकडे परीक्षेतील कथित अनियमितता आणि पेपरफुटीबाबत तक्रार प्राप्त झाली होती. त्यानंतर २२ ते २६ जुलैदरम्यान आलेल्या तक्रारींनी प्रकरणाचे गांभीर्य वाढवले आणि २७ जुलै रोजी आयोगाने मुंबई पोलिसांकडे चौकशी सोपवली. प्राथमिक तपासात परीक्षेपूर्वी एका उमेदवाराकडे प्रश्नांचा संच पोहोचल्याचे आणि त्याला त्याचा फायदा झाल्याचे समोर आल्यानंतर आयोगाने अखेर संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला.
आता फेरपरीक्षेची तारीख जाहीर होण्याची उमेदवारांना प्रतीक्षा आहे. आधीच्या परीक्षेत सहभागी झालेल्या उमेदवारांना पुन्हा अर्ज किंवा शुल्क भरावे लागणार नसल्याने त्यांना दिलासा मिळाला असला, तरी परीक्षा आणि मुलाखतीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण भरती रद्द झाल्याने उमेदवारांमध्ये नाराजीही व्यक्त होत आहे.