नागपुरात काँग्रेस नगरसेवकाच्या घरावर मध्यरात्री गोळीबार

पाच वर्षांची मुलगी दारातच उभी होती

    दिनांक :26-Aug-2026
Total Views |
नागपूर
shubham motghare नागपूरच्या वाठोडा परिसरात काँग्रेसचे नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या घरावर मंगळवारी मध्यरात्री अज्ञात दुचाकीस्वारांनी गोळीबार केल्याने खळबळ उडाली आहे. रात्री सुमारे १२.३० वाजता घडलेल्या या घटनेत सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र, गोळी लागल्याने घराची काच फुटून नुकसान झाले. विशेष म्हणजे, गोळीबार झाला त्यावेळी नगरसेवक शुभम मोटघरे यांच्यासह त्यांचे कुटुंबीय घरातच होते.
 

nagpur firing: congress councillor shubham motghare house targeted, cctv captures attack 
घराच्या बाहेर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संपूर्ण घटना कैद झाली आहे. फुटेजमध्ये दोन दुचाकीस्वार घराजवळून जाताना दिसत असून, त्यापैकी एकाने चालत्या दुचाकीवरून घराच्या दिशेने गोळी झाडल्याचे दिसून येत आहे. गोळीबार केल्यानंतर दोन्ही आरोपी वेगाने घटनास्थळावरून पसार झाले.
 
घटनेची माहिती मिळताच काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे, एसीपी, डीसीपी यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज ताब्यात घेतले असून, अज्ञात हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. या घटनेनंतर वाठोडा परिसरात मोठी खळबळ उडाली असून, नागरिकांमध्येही चिंता व्यक्त केली जात आहे.
 
 
गोळीबार नेमका कोणत्या कारणातून करण्यात आला, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक माहितीनुसार, आरोपींनी घरावर गोळीबार करून तत्काळ पलायन केले. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून, हल्लेखोरांची ओळख पटवण्याचे प्रयत्न केले जात आहेत.दरम्यान, नगरसेवक शुभम मोटघरे यांनी या घटनेची माहिती देताना सांगितले की, गोळीबार झाला त्यावेळी ते बाल्कनीत होते. त्यांची पाच वर्षांची मुलगीही त्यावेळी दरवाजाजवळ उभी होती. मात्र, सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. सीसीटीव्ही फुटेजमध्ये हल्लेखोर वेगाने येताना, घराच्या दिशेने गोळीबार करताना आणि त्यानंतर तातडीने पळून जाताना दिसत असल्याचे त्यांनी सांगितले.या घटनेमुळे नागपूर शहरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. लोकप्रतिनिधीच्या घरावरच मध्यरात्री अशा प्रकारे गोळीबार झाल्याने पोलिसांसमोर हल्लेखोरांचा शोध घेण्याचे आणि या गोळीबारामागील नेमके कारण उघड करण्याचे आव्हान उभे राहिले आहे.