नागपूर
nagpur mayo hospital नागपूर येथील प्रसिद्ध इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अर्थात मेयो परिसरातील ‘श्री बालाजी उपहारगृहावर’ अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई केली आहे. अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन होत असल्याचे तपासणीत आढळून आल्यानंतर हे उपहारगृह तात्काळ सील करण्यात आले. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा पथकाने अचानक पाहणी करत ही कारवाई केली.
मेयो रुग्णालयातील पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी तसेच डॉक्टर दररोज या उपहारगृहात चहा, नाश्ता आणि जेवणासाठी येत होते. मात्र, अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ नुसार व्यवसाय चालवण्यासाठी आवश्यक असलेला अन्न परवाना या उपहारगृहाकडे नसल्याचे तपासणीत स्पष्ट झाले. कोणताही वैध परवाना न घेता उपहारगृह सुरू असल्याचे आढळून आल्याने एफडीएने कठोर भूमिका घेतली.
पाहणीदरम्यान उपहारगृहातील nagpur mayo hospital अस्वच्छताही समोर आली. खाद्यपदार्थ तयार करताना तसेच ग्राहकांना ते देताना आवश्यक आरोग्यविषयक खबरदारी घेतली जात नसल्याचे आढळले. खाद्यपदार्थांमधून निर्माण होणाऱ्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी पुरेशी व्यवस्था नव्हती. याशिवाय, खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याच्या शुद्धतेबाबतचा अधिकृत तपासणी अहवालही व्यवस्थापनाकडे उपलब्ध नव्हता. रुग्णालयाच्या परिसरातच अशा प्रकारची परिस्थिती आढळल्याने संसर्गाचा धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.अन्नपदार्थ हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांची नियमित वैद्यकीय तपासणी करणे नियमांनुसार आवश्यक आहे. मात्र, उपहारगृहातील एकाही कर्मचाऱ्याचा वैद्यकीय तपासणी अहवाल अधिकाऱ्यांना सादर करण्यात आला नाही. त्यामुळे आजारी अथवा अस्वच्छ कर्मचाऱ्यांकडून खाद्यपदार्थ तयार केले जाण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने या बाबीचीही प्रशासनाने गंभीर दखल घेतली.या सर्व त्रुटींच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने ‘श्री बालाजी उपहारगृह’ तात्काळ सील केले. वैध अन्न परवाना प्राप्त करणे, कर्मचाऱ्यांचे फिटनेस अहवाल सादर करणे, पाण्याच्या तपासणीचा दाखला उपलब्ध करून देणे तसेच स्वच्छतेशी संबंधित सर्व त्रुटी दूर करून आवश्यक कागदपत्रे सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या अटींची पूर्तता होईपर्यंत उपहारगृह पुन्हा सुरू करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.