गुन्हा घडल्यानंतर नव्हे तर गुन्हा घडण्यापूर्वीच करणार ‘ॲक्शन’

अँटी गुंडा, निर्भया आणि अँटी भूमाफिया स्क्वॉड सज्ज: बिष्णोई गँगची निघाली फक्त अफवा

    दिनांक :26-Aug-2026
Total Views |
अनिल कांबळे
 
नागपूर,
rumor about the bishnoi gang उपराजधानीतील सामान्य नागरिक आणि तरुणी-महिलांच्या सुरक्षेसाठी नागपूर पोलिसांनी प्राधान्यक्रम निश्चित केला असून आता गुन्हा घडल्यानंतर तपास किंवा गुन्हा घडण्याची वाट न बघता गुन्हा घडण्यापूर्वीच ‘ॲक्शन’ करण्यासाठी पोलिस सज्ज आहेत. गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिस कोणत्याही स्थरावर जाऊन गुन्हेगारांचा ‘बंदोबस्त’ करणार आहेत. शहरातील वाढती गुन्हेगारी, जमीनविषयक वाद, ड्रग्स, वाहतूक कोंडी आणि महिलांच्या सुरक्षेच्या कोणतीही हयगय सहन केली जाणार नाही, असा आक्रमक पवित्रा पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी घेतला.

विश्वास नांगरे पाटील
शहरातील जमिनींच्या वाढत्या किमती आणि त्यातून निर्माण होणारे वाद लक्षात घेता अँटी लँड माफिया स्क्वॉड सज्ज ठेवण्यात येणार आहे. गरीबांच्या जमिनी बळकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या लँड माफियांवर कठोर कारवाई केली जाईल. यासोबतच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींवर नजर ठेवण्यासाठी अँटी गुंडा स्क्वाड सुरू करण्यात येणार आहे. हत्या, हत्येचा प्रयत्न आणि मारहाण यांसारख्या गंभीर गुन्ह्यांना प्रतिबंध करणे ही पोलिसांची पहिली प्राथमिकता असेल. सराईत गुन्हेगारांवर ‘बीटिंग’ आणि प्रतिबंधात्मक कारवाई वाढविण्यात येणार आहे. अँटी गुंडा स्क्वाडकडून दररोज कॉम्बिंग ऑपरेशन राबविले जाईल. गरज भासल्यास संपूर्ण पोलिस दलाच्या मदतीने ‘ऑल आउट ऑपरेशन’ही केले जाईल. 
महिलांच्या सुरक्षेसाठी १२ निर्भया पथके
हैदराबादच्या ‘शी टीम’च्या धर्तीवर नागपुरात १२ निर्भया पथके तयार करण्यात येणार आहेत. या पथकांमध्ये १४४ महिला पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश असेल. त्यापैकी ७२ महिलांना प्रशिक्षण देण्यात आले असून, उर्वरित महिलांचे प्रशिक्षण एका आठवड्यात पूर्ण केले जाणार आहे. तरुणींची छेडछाड आणि महिलांशी संबंधित गुन्ह्यांवर साध्या वेशातील महिला पोलिस लक्ष ठेवतील. शहरातील २० स्मार्ट पोलीस बूथचे ‘पिंक बूथ’मध्ये रूपांतर करण्याचीही योजना आहे.
ड्रग्सच्या संपूर्ण नेटवर्कवर कारवाई
ड्रग्सविरोधी कारवाई केवळ पेडलरपुरती मर्यादित न ठेवता सप्लायर, टोळी आणि फॉरवर्ड-बॅकवर्ड लिंकपर्यंत पोहोचविली जाणार आहे. सायबर फसवणुकीतील म्यूल बँक खात्यांवरही लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. ऑनलाइन आर्थिक फसवणूक, बनावट दुवे आणि विविध प्रकारच्या सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी तपास अधिक सक्षम केला जाणार आहे. तांत्रिक कौशल्य आणि डिजिटल पुराव्यांचा प्रभावी वापर करणार आहे.
बीट पोलिसिंगला नवे बळ
प्रत्येक बीटमध्ये सुमारे १०० नागरिकांचा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करून पोलिस आणि नागरिकांमधील थेट संपर्क वाढविला जाणार आहे. झोपडपट्ट्या आणि संवेदनशील भागांना विशेष प्राधान्य दिले जाईल. वाहतुकीसाठी शहरातील सुमारे ३० हॉटस्पॉट आणि ५० ब्लॅक स्पॉटवर विशेष कारवाई केली जाणार असून, वाहतूक नियमभंगावर नजर ठेवली जाईल.शहरातील सरकारी सीसीटीव्हीसोबतच दुकाने व खासगी आस्थापनांवरील कॅमेरे पोलिस नेटवर्कशी जोडण्यास प्रोत्साहन दिले जाणार आहे. त्यामुळे गुन्हेगारांच्या हालचालींचा माग काढणे अधिक सुलभ होईल.
बिष्णोई टोळी फक्त अफवा
नागपुरातील एका प्राध्यापिकेला आंतरराष्ट्रीय डॉन लॉरेन्स बिष्णोई याने १० लाखांची खंडणी मागितल्याची घटना ही फक्त अफवा आहे. बिष्णोई टोळीने कोणतीही खंडणी मागितलेली नाही. त्यामुळे शहरात बिष्णोई टोळीची फक्त अफवाच पसरली होती, असे स्पष्टीकरण पोलिस आयुक्तांनी दिले.