अनिल कांबळे
नागपूर,
nagpur traffic police वाहनांच्या कर्णकर्कश हॉर्न आणि बेकायदेशीररीत्या बदललेल्या (मॉडिफाईड) सायलेन्सरमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणावर नागपूर वाहतूक पोलिसांनी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात उत्तर दाखल केले आहे. त्रिमूर्ती नगर रहिवासी ॲक्शन विंग फाऊंडेशनतर्फे दाखल जनहित याचिकेवर उत्तर देताना वाहतूक पोलिस उपायुक्त आदित्य मिरखेलकर यांनी हे शपथपत्र सादर केले. मंगळवारी याचिकेवर न्यायमूर्ती उर्मिला जोशी फाळके आणि न्यायमूर्ती राज वाकोडे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. पुढील सुनावणी येत्या ७ सप्टेंबर रोजी होणार आहे. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. तुषार मंडलेकर, सरकारतर्फे अॅड. नितीन राव यांनी बाजू मांडली.
वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ध्वनी प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर मोटार वाहन कायदा आणि महाराष्ट्र मोटार वाहन नियमांनुसार कडक कारवाई केली जात आहे. वर्ष २०२५ मध्ये बेकायदेशीर सायलेन्सर वापरणाऱ्या वाहनांवर विशेष मोहीम राबवून ४४० मॉडिफाईड सायलेन्सर जप्त करून ते नष्ट करण्यात आले. तपासणीदरम्यान बुलेट व इतर दुचाकींचे मोठे आवाज करणारे सायलेन्सर घटनास्थळीच मेकॅनिकच्या मदतीने काढून मूळ सायलेन्सर बसवले जात आहेत.
दंड आणि कारवायांची आकडेवारी
२०२४: ५६८ गुन्हे नोंदवून ३,४६,५०० रुपये दंड वसूल करण्यात आला.
२०२५: ६९३ गुन्हे नोंदवून ५,२८ हजार रुपये दंड वसूल
जुलै २०२६ पयंर्त: २५५ गुन्हे नोंदवून १,५३हजार रुपये दंड वसूल (सोनेगाव, सदर आणि इंदोरा या झोनमध्ये सर्वाधिक कारवाया झाल्याचे दिसून आले आहे).
'ट्रॅफिक मित्र' व्हॉट्सअॅप हेल्पलाइन
ध्वनी प्रदूषणाच्या तक्रारींसाठी पोलिसांनी 'ट्रॅफिक मित्र' व्हॉट्सअॅप हेल्पलाइन क्रमांक (८९७६८९७६९८ ) सुरू केला असून, नागरिकांनी अशा वाहनांची माहिती या क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन केले आहे. वाहतूक पोलिसांनी ही कारवाई निरंतर सुरू राहील, अशी ग्वाही हायकोर्टाला दिली आहे.