काठमांडू
nepal flood disaster तिबेटच्या दिशेने अचानक आलेल्या भीषण पुरामुळे नेपाळच्या रसुवा जिल्ह्यातील टिमुरे बाजार परिसरात मोठी हानी झाली असून, या दुर्घटनेत सुमारे १,००० जण वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र, या वृत्ताला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. लेन्दे खोला (भोटेकोशी) नदीला आलेल्या महापुरामुळे रसुवा सीमा नाक्यावर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, टिमुरेसह आसपासचे दोन बाजार पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या भीषण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नेपाळचे पंतप्रधान बालेन्द्र शाह यांनी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाची आपत्कालीन बैठक बोलावली आहे. त्यांचे सल्लागार असीम शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान शाह प्रभावित भागातील प्रमुख जिल्हाधिकाऱ्यांशी थेट संपर्कात असून परिस्थितीवर क्षणाक्षणाला लक्ष ठेवून आहेत.
रसुवा येथील सहायक प्रमुख जिल्हाधिकारी ध्रुव प्रसाद अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुराच्या पाण्यामुळे बाजारपेठ तसेच कस्टम कार्यालयाच्या परिसराचे मोठे नुकसान झाले आहे. रसुवा भन्सार परिसरात मोठ्या संख्येने वाहने आणि इतर साहित्य होते; ते पुराच्या पाण्यात वाहून गेले. मागील वर्षीच्या पुरात नुकसान झालेल्या ठिकाणी नुकताच उभारण्यात आलेला नवा पूलही या पुरात वाहून गेला आहे.बुधवारी सकाळी सुमारे ९ वाजता अचानक आलेल्या या महापुराने टिमुरे बाजारातील वस्तीला मोठा फटका बसला. रसुवा जिल्हा पोलीस कार्यालयाने या घटनेची माहिती दिली. रसुवाचे प्रमुख जिल्हाधिकारी नरेन्द्र परियार यांनी सांगितले की, अचानक आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या खालच्या भागात असलेल्या जलविद्युत प्रकल्पांचे नुकसान होऊन ते वाहून गेल्याची, तसेच वस्त्यांमध्ये पुराचे पाणी शिरल्याची माहिती मिळाली आहे.तिबेटच्या दिशेने आलेल्या या पुरामुळे नेपाळ पोलिसांच्या तीन कार्यालयांनाही मोठी झळ बसली आहे. पोलीस मुख्यालयानुसार, रसुवा जिल्ह्यातील इलाका प्रहरी कार्यालय टिमुरे, प्रहरी चौकी स्याफ्रुबेसी आणि प्रहरी चौकी रसुवागढी या तीन ठिकाणी नुकसान झाले आहे. दरम्यान, पुराचे पाणी नुवाकोट जिल्ह्यातही पोहोचले असून, जिल्हा प्रशासन कार्यालय नुवाकोटचे माहिती अधिकारी रूपेश प्रसाद नेपाल यांनी याला दुजोरा दिला आहे.
रसुवातील पूरस्थिती आणि संभाव्य nepal flood disaster धोका लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी काठमांडूहून रसुवा, नुवाकोट, चितवन आणि धादिङकडे जाणारी वाहने काठमांडूतच रोखली आहेत. काठमांडू उपत्यका ट्रॅफिक पोलीस कार्यालयाचे एसपी नरेशराज सुवेदी यांनी सांगितले की, पूरस्थिती लक्षात घेऊन या जिल्ह्यांकडे जाणारी वाहनांची वाहतूक थांबविण्यात आली आहे.
पूरग्रस्त भागात मदत आणि बचावकार्य करण्यासाठी nepal flood disaster नेपाळी लष्कराची दोन हेलिकॉप्टर रसुवाकडे रवाना करण्यात आली आहेत. नेपाळी लष्कराचे प्रवक्ते आणि ब्रिगेडियर जनरल राजाराम बस्नेत यांनी दोन्ही हेलिकॉप्टर पूरग्रस्त भागाकडे पाठविल्याचे सांगितले. भोटेकोशी नदीला आलेल्या भीषण पुरानंतर पंतप्रधान कार्यालयाने सर्व हेलिकॉप्टर कंपन्यांनाही सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत.पंतप्रधान बालेन्द्र शाह यांच्या सचिवालयाने आवश्यकतेनुसार तातडीने सेवा सुरू करता यावी, यासाठी सर्व हेलिकॉप्टर कंपन्यांना तयार राहण्यास सांगितले आहे. या निर्देशाची सचिवालयाकडून पुन्हा पुष्टी करण्यात आली आहे.भोटेकोशी नदीला आलेल्या पुराच्या पार्श्वभूमीवर रसुवा, नुवाकोट, धादिङ, गोरखा आणि चितवन या पाच जिल्ह्यांमधून वाहणाऱ्या नद्यांच्या काठावरील रहिवाशांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.दरम्यान, रसुवा जिल्ह्यात पुरामुळे झालेल्या व्यापक नुकसानीच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री सुदन गुरुङ यांच्या उपस्थितीत मान्सून प्रतिकार्य कमांड पोस्टची आपत्कालीन बैठक सुरू झाली आहे. या बैठकीत पुरामुळे झालेली हानी, शोध व बचावकार्य तसेच मदतकार्याबाबत आवश्यक निर्णय घेतले जाणार आहेत.
गृहमंत्री सुदन गुरुंग यांनी तिबेटच्या दिशेने भोटेकोशी नदीला मोठा पूर आल्याने नदीकाठच्या भागातील नागरिकांना तातडीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी जारी केलेल्या अत्यावश्यक सार्वजनिक सूचनेनुसार, भोटेकोशी आणि त्रिशूली नदीच्या काठावरील मुग्लिनपर्यंतचा भाग उच्च सतर्कता आणि उच्च जोखमीच्या स्थितीत आहे. त्यामुळे रसुवा, धादिङ, गोरखा, चितवन आणि नुवाकोट जिल्ह्यांतील नदीकाठच्या कुटुंबांनी पुढील आदेशापर्यंत सुरक्षित ठिकाणी राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
शोध व बचावकार्याची गरज भासल्यास किंवा कोणत्याही प्रकारच्या मदतीची आवश्यकता असल्यास तातडीने टोल-फ्री क्रमांक १२३४ वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच पृथ्वी राजमार्ग, गल्छी–नुवाकोट–रसुवा–स्याफ्रुबेसी मार्ग आणि मुग्लिन–नारायणगढ मार्गावर प्रवास करू नये, तसेच या मार्गांवरील वाहतूक पूर्णपणे थांबवावी, असेही गृहमंत्र्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.