कराची,
asia cup महिला आशिया कप सुरू होण्याच्या काही दिवस आधी पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठी घडामोड घडली आहे. पाकिस्तानची वेगवान गोलंदाज आयमान अन्वरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तातडीने निवृत्ती जाहीर केली आहे. २८ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या महिला आशिया कप स्पर्धेपूर्वी तिच्या निर्णयाची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, आयमानने क्रिकेटशी पूर्णपणे नाते तोडलेले नसून ती आता वेगळ्या भूमिकेतून या खेळाशी जोडलेली राहणार आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आयमानच्या निवृत्तीला दुजोरा दिला आहे. जुलै २०१६ ते फेब्रुवारी २०२३ या कालावधीत तिने पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले. आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत आयमानने ८ एकदिवसीय आणि ३७ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले. अशाप्रकारे तिने पाकिस्तानकडून एकूण ४५ आंतरराष्ट्रीय सामने खेळताना ३३ बळी मिळवले. यात एकदिवसीय क्रिकेटमध्ये तिच्या नावावर ४, तर टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांत २९ बळी आहेत. साउथहॅम्प्टन येथे जुलै २०१६ मध्ये इंग्लंडविरुद्ध झालेल्या टी-२० सामन्यात आयमानने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर फेब्रुवारी २०१७ मध्ये कोलंबो येथे बांगलादेशविरुद्ध तिने पहिला एकदिवसीय सामना खेळला. जवळपास सात वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत तिने पाकिस्तानचे अनेक महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये प्रतिनिधित्व केले.
आयमान २०१८, २०२० आणि २०२२-२३ या महिला टी-२० विश्वचषकांसाठी पाकिस्तान संघाचा भाग होती. याशिवाय न्यूझीलंडमध्ये झालेल्या २०२२ च्या आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषकातही तिने सहभाग घेतला होता. निवृत्तीनंतरही ३४ वर्षीय आयमान अन्वर क्रिकेटपासून दूर जाणार नाही. अलीकडेच तिने निवेदिका म्हणूनही काम केले आहे. यावर्षी जानेवारीमध्ये तिने क्रिकेट रेफरी इंडक्शन कोर्स यशस्वीपणे पूर्ण केला. त्यानंतर २४ ऑगस्ट रोजी कराची येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय महिला अंडर-१९ स्पर्धेत सामनाधिकारी म्हणून तिने नव्या भूमिकेतील कारकिर्दीला सुरुवात केली. खेळाडू म्हणून आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपवल्यानंतर आयमान आता सामनाधिकारी म्हणून क्रिकेटच्या मैदानावर दिसणार आहे. दरम्यान, पाकिस्तान महिला क्रिकेट संघ आगामी एसीसी महिला आशिया कपमध्ये सहभागी होणार असून, ५ सप्टेंबर रोजी पाकिस्तानचा सामना भारतीय महिला संघाविरुद्ध होणार आहे.