बेलगाव तलावात कीटकनाशकांचा कहर; हजारो मासे मृत!

मासेमारी संस्थेचे दोन लाखांचे नुकसान, पोलिसांत तक्रार

    दिनांक :26-Aug-2026
Total Views |
गोंदिया
pesticide-havoc जिल्हा परिषद मालकीच्या तलावात मोठ्या प्रमाणात मासे मृतावस्थेत आढळून आल्याची खळबळजनक घटना देवरी तालुक्यातील बेलगाव येथे उघडकीस आली आहे. शेतातील खोडकिडीच्या नियंत्रणासाठी तलावालगतच्या बांधावर कीटकनाशकांची फवारणी करण्यात आल्याने त्याचा विषारी परिणाम तलावातील पाण्यावर होऊन मासे मृत्युमुखी पडल्याचा आरोप मत्स्य व्यवसाय करणार्‍या संस्थेकडून करण्यात आले असून या घटनेत संस्थेचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. याप्रकरणी चिचगड पोलिसांत तक्रार नोंदविण्यात आली आहे.
 
gondia
बेलगाव येथील गट क्रमांक १४, आराजी १.३८ हेक्टर क्षेत्रफळाचा हा तलाव जिल्हा परिषद मालकीचा आहे. दरम्यान, पंकज मत्स्य पालन सहकारी संस्था, पलानगाव या संस्थेने सन २०२२ ते २०२७ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी तलाव लीजवर घेतला आहे. संस्थेने मागील दोन वर्षांत मत्स्यबीज संचयन करून माशांचे संवर्धन केले होते. त्यामुळे तलावातील मासे साधारणतः १ ते ५ किलो वजनाचे झाले होते. मात्र, शेतात खोडकिडीचा प्रादुर्भाव झाल्याचे सांगून त्याच गावातील शांतिलाल रामसु पडोटी यांनी तलावालगतच्या एका बांधावर ‘कोरोला’ व ‘ब्लू चिप’ नावाची कीटकनाशके फवारल्यानंतर तलावातील पाण्यात मोठ्या प्रमाणात मासे मृतावस्थेत तरंगताना आढळून आल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, केवळ एका बांधावर केलेल्या फवारणीमुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात मासे मृत्युमुखी पडले असतील का? किंवा तलावात अन्य कोणते विषारी द्रव्य टाकण्यात आले होते का? असा सवाल संस्थेचे सभासद आणि ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात असून याची चौकशी व्हावी, अशी मागणी होत आहे.
 
या घटनेमुळे मत्स्य व्यवसायावर अवलंबून असलेल्या कुटुंबांच्या रोजीरोटीवर थेट आघात झाला आहे. संस्थेचे सचिव तुलाराम कुराडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मत्स्यबीज आणि विक्रीयोग्य झालेल्या माशांच्या मृत्यूमुळे संस्थेचे अंदाजे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी न्याय मिळावा आणि दोषींवर कारवाई व्हावी, यासाठी चिचगड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, तलावातील पाण्याचे नमुने, मृत माशांचे नमुने आणि फवारण्यात आलेल्या कीटकनाशकांची वैज्ञानिक तपासणी केल्यास या घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे. त्यामुळे संबंधित कृषी, मत्स्य व महसूल विभागाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून पंचनामा व प्रयोगशाळा तपासणी करावी, अशी मागणी संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे.