टीबीमुक्त भारतासाठी गोंदियाच्या पाच गावांत पायलट अभियान

माय भारत व एनसीसी स्वयंसेवकांना प्रशिक्षण, ग्रामीण भागात क्षयरोग जनजागृती

    दिनांक :26-Aug-2026
Total Views |
गोंदिया
tb-free-india क्षयरोगमुक्त भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आता ग्रामीण भागातील अतीजोखमीच्या गावांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या अंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील पाच गावांत ‘टीबीमुक्त भारत’ अभियानाचा पायलट प्रकल्प राबविण्यात येणार असून, माय भारत व एनसीसीच्या स्वयंसेवकांमार्फत गावागावांत क्षयरोगाविरोधात जनजागृती केली जाणार आहे. यासाठी स्वयंसेवकांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे.

tb free india 
 
केंद्र शासनाच्या टीबीमुक्त भारत अभियानाला ग्रामीण भागात व्यापक स्वरूप देण्यासाठी केंद्रीय क्षयरोग विभाग, दिल्लीच्या मार्गदर्शनानुसार अतीजोखमीच्या गावांत हे पायलट प्रोजेक्ट राबविण्यात येत आहे. यात गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया तालुक्यातील कटंगी कला, गोरेगाव तालुक्यातील हिरडामाली, सालेकसातील दरबडा, आमगावातील बाम्हणी आणि तिरोडा तालुक्यातील खैरबोडी या गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये माय भारत व एनसीसीचे प्रशिक्षित स्वयंसेवक प्रत्यक्ष क्षेत्रात कार्यरत राहून नागरिकांमध्ये क्षयरोगाबाबत जनजागृती करणार आहेत. टीबीची लक्षणे ओळखणे, वेळेवर तपासणी करून घेणे, उपचाराचे महत्त्व तसेच टीबीपासून बचावाच्या उपाययोजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यावर भर दिला जाणार आहे. तर संशयित रुग्णांना तपासणी व उपचारासाठी प्रवृत्त करण्याची जबाबदारीही स्वयंसेवक पार पाडणार आहेत. दरम्यान, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच अनुभवात्मक प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी स्वंयसेवकांना टीबीची लक्षणे, निदान, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले आहे. ग्रामीण व समुदाय पातळीवर जनजागृती कशी प्रभावीपणे राबवावी, याचेही प्रशिक्षण देण्यात आले आहे.
 
पाच गावांपासून सुरू होणार्‍या या पायलट उपक्रमातून ग्रामीण भागातील टीबी संशयित रुग्णांचा शोध, वेळेवर तपासणी आणि उपचाराची साखळी अधिक प्रभावी करण्यास मदत होणार असून, टीबीमुक्त गोंदियाच्या दिशेने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
- डॉ. अभिजीत गोल्हार, जिल्हा क्षयरोग अधिकारी, गोंदिया