गडचिरोलीच्या विकासासाठी ‘विकसित गडचिरोली व्हिजन 2047’चा संकल्प

    दिनांक :26-Aug-2026
Total Views |
गडचिरोली
developed-gadchiroli-vision-2047 जिल्ह्याच्या 44 व्या वर्धापन दिनानिमित्त राजीव गांधी सभागृहात ‘आकांक्षित जिल्हा ते विकसित गडचिरोली व्हिजन 2047’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी व्हिजन 2047 चे सादरीकरण केले. तसेच प्रगतीशील शेतकरी, उद्योजक, महिला उद्योजक, पत्रकार, समाजसेवक व विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा ‘जिल्हा गौरव पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला.
 
gadchiroli
16 व 17 ऑगस्ट रोजी झालेल्या कार्यशाळेत मांडण्यात आलेल्या जिल्ह्याच्या विकासाच्या सूचना व संकल्पनांचा आढावा यावेळी घेण्यात आला. शिक्षण, आरोग्य, शेती, सिंचन, उद्योग, रोजगार, पायाभूत सुविधा व पर्यटनाच्या माध्यमातून 2047 पर्यंत गडचिरोलीला विकसित व सक्षम जिल्हा बनविण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.
 
अहेरी उपविभागाला अधिक प्रशासकीय व आर्थिक अधिकार देण्याची मागणी तसेच ‘शैक्षणिक विकास आराखडा-गडचिरोली 2047’ तयार करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. शासकीय शाळा व आश्रमशाळांचे डिजिटल मॉडेल स्कूलमध्ये रूपांतर करण्यावरही भर देण्यात आला. गडचिरोलीतील प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला ‘गोंडवाना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय’ नाव देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचे डॉ. होळी यांनी सांगितले.
 
जिल्हा निर्मितीसाठी योगदान देणारे कै. बाबुराव मडावी, माजी खासदार मारोतराव कोवासे व माजी आमदार पेंटराम तलांडी यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधी व नागरिकांना यावेळी अभिवादन करण्यात आले. शासन, प्रशासन व नागरिकांच्या समन्वयातून ‘विकसित गडचिरोली व्हिजन 2047’ साकारण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.