अनिल कांबळे
नागपूर
official-convicted-of-bribery दक्षिण पूर्व मध्य रेल्वेतील (एसईसीआर) वरिष्ठ विभागीय साहित्य व्यवस्थापक अजय कुमार याला लाचखोरीप्रकरणी न्यायालयाने दोषी ठरवत चार वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) सापळा रचून आरोपीला लाच स्वीकारताना रंगेहात पकडले होते.
सीबीआयने दाखल केलेल्या प्रकरणानुसार, खरेदी आदेशाच्या एकूण रकमेच्या पाच टक्के म्हणजेच १ लाख ७ हजार रुपयांची बेकायदा लाच मागितल्याचा अजय कुमार याच्यावर आरोप होता. लाचेपैकी २० हजार रुपये पहिला हप्ता म्हणून स्वीकारण्याचे त्याने मान्य केले होते.
या मागणीनुसार २३ ऑगस्ट २०१६ रोजी सीबीआयच्या पथकाने सापळा रचला. त्यावेळी अजय कुमार याला २० हजार रुपयांची लाच मागताना आणि स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. त्यानंतर सीबीआयने त्याच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून तपास पूर्ण केला आणि न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. न्यायालयाने पुरावे व साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे आरोपीला दोषी ठरवले. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७ अंतर्गत तीन वर्षांचा सश्रम कारावास आणि तीन लाख रुपये दंड, तर कलम १३(२) सह १३(१)(ड) अंतर्गत चार वर्षांचा सश्रम कारावास आणि तीन लाख रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली. या निकालामुळे शासकीय सेवेत पदाचा गैरवापर करून लाच मागणाऱ्यांना कायद्याचा कठोर इशारा मिळाला आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयचे अधीक्षक ऋषीकेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनात झाला.