मुंबई
rakhi delivery राखी पौर्णिमेचा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. घरापासून दूर, देशातील दुसऱ्या शहरात किंवा सातासमुद्रापार राहणाऱ्या भावाच्या मनगटावर राखी बांधण्याची इच्छा असलेल्या बहिणींसाठी आता अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. ऑनलाइन सुविधेमुळे अवघ्या १० ते १५ मिनिटांत राखी बुक करून ती भावापर्यंत पोहोचवता येऊ शकते. बाजारात साधारण ४० रुपयांपासून हजारो रुपयांपर्यंत विविध प्रकारच्या राख्या उपलब्ध असून, राखीसोबत भेटवस्तू पाठवण्याची सुविधाही मिळत आहे.
ऑनलाइन राखी बुक करण्यासाठी मोबाईल किंवा कॉम्प्युटरवर आयजीपी (IGP) किंवा एफएनपी (FNP) यांसारख्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन आवडीनुसार राखी निवडता येते. डिझायनर राखी, रुद्राक्ष राखी किंवा गिफ्ट हॅम्पर अशा विविध पर्यायांमधून निवड करता येते. त्यानंतर भावाचा अचूक पत्ता, पिनकोड आणि सुरू असलेला मोबाईल क्रमांक भरावा लागतो. राखी लवकर पोहोचवायची असल्यास त्याच दिवशीची डिलिव्हरी किंवा एक्स्प्रेस डिलिव्हरीचा पर्याय निवडता येतो. यूपीआय, डेबिट किंवा क्रेडिट कार्ड तसेच नेट बँकिंगच्या माध्यमातून ऑनलाइन पेमेंट करून ऑर्डर निश्चित करता येते. याशिवाय अॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि लिंकईट यांसारख्या प्लॅटफॉर्मवरूनही सेम-डे डिलिव्हरीची सुविधा असलेले राखी कॉम्बो बुक करता येतात.
ऑनलाइन राखी खरेदी केल्यानंतर भावाचा पत्ता, फोन नंबर आणि पिनकोड भरल्यास काही सेवांमध्ये अवघ्या १० ते १५ मिनिटांत राखी पाठवण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे भावंडे दूर असली तरी राखीच्या माध्यमातून रक्षाबंधनाचा आनंद वेळेत साजरा करणे शक्य होणार आहे.
दरम्यान, भारतीय टपाल विभागानेही रक्षाबंधनासाठी विशेष व्यवस्था केली आहे. पावसाळ्याच्या दिवसांत टपालाद्वारे पाठवलेली राखी भिजून खराब होण्याची शक्यता लक्षात घेऊन विभागाने ‘वन स्टॉप राखी सोल्युशन’ अंतर्गत विशेष वॉटरप्रूफ राखी लिफाफे उपलब्ध करून दिले आहेत. या लिफाफ्यांची किंमत अवघी १२ रुपये आहे. राखी सुरक्षितपणे भावापर्यंत पोहोचावी, हा या विशेष लिफाफ्यांमागील उद्देश आहे.हे विशेष लिफाफे तीन वेगवेगळ्या आणि आकर्षक डिझाइनमध्ये उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे केवळ शहरांमध्येच नव्हे, तर ग्रामीण भागातील सर्व टपाल कार्यालयांमध्येही हे लिफाफे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यासोबत स्पीड पोस्टची सुविधाही घेता येणार असल्याने राखी वेळेत पोहोचवणे अधिक सोपे होणार आहे.
टपाल विभागाने देशात तसेच परदेशात राहणाऱ्या भावंडांपर्यंत राखी आणि भेटवस्तू सुरक्षितपणे पाठवण्यासाठी विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सुरक्षित पॅकिंग, स्पीड पोस्ट, नोंदणीकृत टपाल आणि पार्सल बुकिंग अशा सुविधा एकाच ठिकाणी मिळणार आहेत. त्यामुळे ऑनलाइन डिलिव्हरीचा पर्याय असो किंवा टपाल विभागाचा वॉटरप्रूफ लिफाफा, यंदाच्या राखी पौर्णिमेला दूर असलेल्या भावापर्यंत राखी पोहोचवण्यासाठी बहिणींसमोर अनेक पर्याय उपलब्ध आहेत.