राखी अगोदर चारित्र्याच्या संशयातून दोन सख्ख्या बहिणींची हत्या

15 मिनिटांत भावाने घडवले दुहेरी हत्याकांड

    दिनांक :26-Aug-2026
Total Views |
उत्तराखंड
roorkee double murder रुरकी शहरात मंगळवारी रात्री घडलेल्या दुहेरी हत्याकांडाने परिसर हादरला आहे. चारित्र्याच्या संशयातून एका भावाने आपल्या दोन सख्ख्या बहिणींवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने अवघ्या १० ते १५ मिनिटांच्या अंतरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन हा रक्तरंजित प्रकार घडवून आणला. या हल्ल्यात आरोपीचा मेहुणाही गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
 

roorkee double murder man shoots dead two sisters over character suspicion, brother-in-law injured 
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी विवेक कुमार ऊर्फ विकी याने मंगळवारी रात्री अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने हा हल्ला केला. सर्वप्रथम तो त्याची पहिली बहीण पुष्पा हिच्या घरी पोहोचला. तेथे त्याने पुष्पावर थेट गोळीबार केला. गोळ्या लागल्याने पुष्पाचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून तातडीने निघून गेला आणि सुमारे १० ते १५ मिनिटांत दुसरी बहीण शकुंतला हिच्या घरी पोहोचला.
शकुंतलाच्या घरी पोहोचल्यानंतर आरोपीने तिच्यासह तिच्या पतीवरही अंधाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात शकुंतलाचा जागीच मृत्यू झाला, तर तिचा पती अनेक गोळ्या लागल्याने गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अवघ्या १५ मिनिटांच्या कालावधीत घडलेल्या या दुहेरी हत्याकांडामुळे रुरकी परिसरात खळबळ उडाली आहे.
घटनेनंतर आरोपी विवेक कुमार घटनास्थळावरून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच गंगानहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिसराला वेढा घातला. पोलिसांनी घटनास्थळावरून वैज्ञानिक पुरावे गोळा केले असून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेजही तपासण्यात आले. तपासाची सूत्रे वेगाने हलवत पोलिसांनी उशिरा रात्री आरोपी विकीला अटक केली.
ग्रामीण भागाचे पोलीस अधीक्षक शेखर चंद सुयाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात आरोपीला आपल्या बहिणींच्या चारित्र्यावर संशय असल्याचे समोर आले आहे. मात्र, या हत्याकांडामागे आणखी काही कौटुंबिक किंवा आर्थिक वाद आहे का, याचाही पोलीस तपास करत आहेत.
रक्षाबंधनासारख्या सणाच्या तोंडावरच सख्ख्या बहिणींच्या हत्येची घटना घडल्याने परिसरात संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे. कौटुंबिक वादातून होणाऱ्या हिंसक घटनांमध्ये वाढ होत असताना रुरकीतील या दुहेरी हत्याकांडाने नात्यांमधील वाढता हिंसाचार पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे.