अनिल कांबळे
नागपूर,
rotten betel nuts worth शहरात गेल्या काही दिवसांपासून अन्न व औषध प्रशासन विभागाची छापेमारी सुरु असल्यामुळे शहरातील खाद्य व्यवसायांमध्ये खळबळ उडाली आहे. कळमना परिसरात एफडीए विभागाने २ कोटी २३ लाख रुपयांची ५५ हजार ९९६ किलो भाजलेली सुपारी निकृष्ट असल्याच्या संशयावरून जप्त केली.
प्रतिबंधित आणि संशयित अन्नपदार्थांच्या साठवणुकीविरुद्ध सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाच्या अन्न शाखेने कळमना येथील गौरीश ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेडची तपासणी केली. या वेळी कंपनीच्या ठिकाणी ५५ हजार ९९६ किलो भाजलेली सुपारी आढळली. या साठ्याची अंदाजे किंमत २ कोटी २३ लाख ९८ हजार ४०० रुपये आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात साठा आढळल्याने प्रशासनाने त्याची गुणवत्ता आणि संबंधित कागदपत्रांची तपासणी सुरू केली. पथकाने हा संपूर्ण साठा ताब्यात घेतला असून, अन्न सुरक्षा व मानके अधिनियमानुसार पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.
बुऱ्हानपूर जिलेबी सेंटरवर कारवाई
प्रतापनगर रिंग रोडवरील सावनाली अपार्टमेंटमधील बुऱ्हानपूर जिलेबी सेंटरची नियमित तपासणी करण्यात आली. यामध्ये स्वच्छता, अन्न हाताळणी, साठवणूक, पाणीपुरवठा आणि कर्मचाऱ्यांची स्वच्छता यांसह अन्नसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन आढळले. त्यामुळे आस्थापनाचा अन्नपरवाना निलंबित करण्यात आला.
त्याचवेळी बुऱ्हानपूर जिलेबी सेंटरसह
गिरीपेठ येथील लॉ कॉलेज चौकातील स्टेप इन रेस्टॉरंटमध्येही अन्नसुरक्षा व स्वच्छतेशी संबंधित नियमांचे पालन झाले नसल्याचे तपासणीत आढळले. त्यामुळे या आस्थापनाचा परवानाही निलंबित करण्यात आला. हॉटेलांवरील कारवाई नियमित तपासणीचा भाग असल्याचे अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले आहे