शिवमूठ अर्थात शिवमुष्टी व्रत!

    दिनांक :26-Aug-2026
Total Views |

धर्म-संस्कृती....
प्रा. दिलीप जोशी,
shivmuthor the shivmushti vrat श्रावण महिन्यात भगवान शिवाची उपासना केली जाते. हिंदू धर्मात श्रावणात विविध व्रत-वैकल्ये केली जातात. त्यात प्रत्येक श्रावणी सोमवारी महादेवाच्या पिंडीवर शिवमूठ वाहण्याचा विधी आहे. श्रावण सोमवारी माता, भगिनी शिवमंदिरात किंवा आपल्या घरी देवघरात शिवपिंडीवर विशिष्ट धान्य घेऊन हे धान्य मुठीत घेऊन महादेवाच्या पिंडीवर अर्पण करतात. मूठभर वाहिलेल्या धान्याला शिवमूठ म्हणतात. या व्रताला शिवमुष्टी व्रत म्हणतात.
 
shivmuthor the shivmushti vrat
 
शिवमुष्टी व्रत अत्यंत प्रभावी, प्रसिद्ध आणि प्रासादिक व्रत आहे. श्रावण सोमवारी सौभाग्यवती महिला सकाळीच शुचिर्भूत होऊन, भगवान शंकराच्या मंदिरात किंवा आपल्या देवघरात असलेल्या महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक करून यथासांग पूजा करतात. त्यानंतर बिल्वपत्रे अर्पण केली जातात. त्यानंतर विशिष्ट धान्य उजव्या मुठीत घेऊन ती मूठ धान्य धारा पिंडीवर त्रिवार, पाचवार सोडली जाते. शिवमुष्टी खालील मंत्राने अर्पण केली जाते.
 
नमः शिवाय शांताय पंचवक्त्राय शूलिने ।
शृंगिभृंगिमहाकालगणयुक्ताय शंभवे।।

त्यानंतर आर्त भावाने आरती केली जाते.
शिवमुष्टीसाठी पहिल्या श्रावण सोमवारी तांदूळ, दुसऱ्या श्रावण सोमवारी तिळ, तिसऱ्या श्रावण सोमवारी मूग तर चौथ्या सोमवारी जव किंवा गहू अर्पण करतात. जर पाचवा सोमवार असेल तर एकत्रित धान्यमूठ ज्याला सातू मूठ अर्पण करतात.

या धान्यांचे अर्पण म्हणजे ऊर्जेची हस्तांतरण प्रक्रिया आहे. ही पंचधान्ये पंचतत्त्वाची द्योतक आहेत. जव पृथ्वीतत्त्वाचे, तिळ अग्नितत्त्वाचे, मूग जलतत्त्वाचे, तांदूळ वायुतत्त्वाचे आणि सातू मिश्रधान्य आकाश तत्त्वाचे प्रतीक आहे. शिवमूठ श्रावणात अगत्यानेवाहतात कारण श्रावणात भगवान शिव कैलासावर आलेले असतात. शिवमुष्टी व्रतसदृश कथेचा संदर्भ स्कंद पुराण आणि प्रचलित असलेल्या कथांमध्ये आलेला आहे.

स्कंद पुराणात माता पार्वतीने भगवान शंकरांना प्राप्त करण्यासाठी अपर्णा व्रत केले. त्यात महादेवाच्या पिंडीवर बिल्व वाहून एक मुष्टी धान्य अर्पण करण्याचा गर्भितार्थ विद्वानांनी दिला आहे. प्रचलित कथेत एका राजाला चार सुना होत्या. त्यात एक नावडती असल्याने तिला दररोज गुरे राखण्यास जंगलात जावे लागे. एक दिवस तिला नागकन्या, देवकन्या दिसल्या. त्यांच्याकडून नावडतीने शिवमुष्टी व्रत घेतले. त्या व्रताच्या योगाने ती नावडतीची आवडती झाल्याची कथा आहे.

या कथेचा आधार घेऊन शिवमूठ वाहिल्यावर
“शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा. सासू-सासऱ्या, दिरा-भावा, नणंदा-जावा, भ्रतारा, नावडती आहे ती आवडती कर रे देवा.”

ही प्रार्थना करण्यात येते.
खरं म्हणजे भारतीय संस्कृती व्यष्टी, समष्टी, सृष्टी आणि परमेष्ठी यांची सांगड घालणारी आहे. शिवमुष्टी व्रतात हाच विचार आहे. ‘‘आत्मनो मोक्षार्थम् जगद् हितायच’’ हे तत्त्व इथे आहे. या व्रतात भगवान शिवाची आराधना आहेच, शिवाय एक मूठभर वाहिलेले धान्य मंदिराचे पुजारी, गुरव किंवा गरजूंना मिळत असे. त्यामुळे आपल्या घासातील घास दुसऱ्यांना देणे हा माणुसकीचा धर्म घडतो.

अशाच व्रताचे अनुसरण करून कर्मवीर भाऊराव पाटील यांनी एकमुष्टी धान्य योजना तयार केली. गावातील लोकांकडून मूठभर धान्य घेऊन त्यातून त्यांनी गोरगरिबांच्या मुलांसाठी वसतिगृह चालविले. आजकाल अनेक संस्था एकमुष्टी धान्य योजना गरजूंसाठी चालवितात. लोकांचा प्रचंड प्रतिसाद असतो. जीवात शिव पाहणारी आपली संस्कृती आहे. त्यामुळे कुणाचे तरी पोट भरेल या उदात्त हेतूने शिवमूठ आपल्या संस्कृतीत आहे. स्वत:ला मोक्ष मिळतो आणि इतरांना धान्य असा दुहेरी उद्देश या मागे आहे.

शिवाय बिल्व ही आयुर्वेदिक वनस्पती आहे. त्याचाही फायदा आपल्याला होतोच. त्यामुळे शिवमुष्टी व्रताचे अध्यात्म आणि विज्ञान लक्षात येईल. म्हणूनच “आत्मनो मोक्षार्थम् जगद् हितायच’’ हा दुहेरी फायदा देणारे व्रत म्हणजे शिवमुष्टी व्रत होय.

९८२२२६२७३५