मुंबई
sneha wagh मराठी अभिनेत्री स्नेहा वाघ हिने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने चाहत्यांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं. मात्र, तिचं खासगी आयुष्य अनेक चढ-उतारांनी भरलेलं राहिलं आहे. दोन विवाह फार काळ टिकले नाहीत. अशात तिसऱ्या घटस्फोटानंतर स्नेहा पुन्हा लग्न करणार का, याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे. 2026 पासून स्नेहा एकटीच राहत असल्याचं सांगितलं जात आहे. याच पार्श्वभूमीवर नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने आपल्या खासगी आयुष्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
स्नेहाला भविष्यात पुन्हा लग्न करण्याचा विचार आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ती म्हणाली, ‘लग्न आता माझं बिलकूल प्राधान्य नाही. याचा अर्थ मी कधी लग्न करणार नाही असा होत नाही. मी लग्न करणार नाही असा निर्णय अद्याप घेतलेला नाही. पण मी स्वतःभोवती एक मर्यादा ठरवलेली आहे…’
पुढे स्नेहाने स्पष्ट केलं की, सध्या तिचं लक्ष लग्नावर नाही. ‘जेव्हा आपण लग्नासारख्या गोष्टींना अधिक महत्त्व देत नाही, तेव्हाच आपण पुढे जातो. भविष्यात माझं लग्न होईल याबद्दल मी खात्री देऊ शकत नाही…’, असं ती म्हणाली.
स्नेहा सध्या कृष्णभक्तीत रमली असून, अध्यात्मामुळे आयुष्यात आलेल्या बदलांबद्दलही तिने मनमोकळेपणाने भाष्य केलं. ‘मला आता कोणत्या माणसासोबत नात्यामध्ये राहण्याची गरज वाटत नाही. कारण कृष्णाने माझ्या आयुष्यातील पोकळी भरून काढली आहे,’ असं स्नेहाने सांगितलं. ‘मी आता समाधानी आहे आणि मला यातून बाहेर पडायचं नाही,’ असंही तिने स्पष्ट केलं.आपल्या आयुष्यातील कठीण काळाची आठवण सांगताना स्नेहा म्हणाली, ‘एक काळ असा देखील होता, जेव्हा मला कोणावरच विश्वास नव्हता. प्रत्येक जण स्वार्थी आहे, असंच मला वाटत होतं. अखेर मी अध्यात्माचा मार्ग स्वीकारला….’ त्यामुळे सध्या तिच्या आयुष्यात लग्नापेक्षा अध्यात्म आणि स्वतःचा आनंद अधिक महत्त्वाचा असल्याचं तिच्या वक्तव्यावरून दिसून येतं.
स्नेहा वाघच्या खासगी आयुष्याचा विचार केला तर, वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी तिने अविष्कार दार्वेकरसोबत पहिलं लग्न केलं. मात्र, या नात्यात ती कौटुंबिक अत्याचाराची बळी पडली. त्यानंतर तिने 2015 मध्ये अनुराग सोळंकी याच्यासोबत दुसरं लग्न केलं. मात्र, तिचं हे दुसरं लग्नही फार काळ टिकू शकलं नाही आणि अखेर तिने दुसऱ्या नवऱ्यापासूनही विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
अशा परिस्थितीत स्नेहा पुन्हा विवाहबंधनात अडकणार का, याचं निश्चित उत्तर तिने दिलेलं नाही. मात्र, सध्या तरी लग्न हा तिच्या आयुष्यातील प्राधान्याचा विषय नसल्याचं आणि कृष्णभक्ती व अध्यात्मामुळे ती समाधानी असल्याचं तिच्या वक्तव्यावरून स्पष्ट होतं.