मुंबई,
starcs record surpassed bumrah भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला आयसीसीच्या ताज्या कसोटी क्रमवारीत मोठा धक्का बसला आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरू असलेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत बुमराह खेळत नसल्याचा परिणाम त्याच्या क्रमवारीवर झाला आहे. दीर्घकाळ कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या बुमराहला आता दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने बुमराहला मागे टाकत प्रथमच आयसीसी कसोटी क्रमवारीतील अव्वल स्थान पटकावले आहे. स्टार्कने दोन स्थानांची झेप घेत ८७२ रेटिंग गुणांसह नंबर वन गोलंदाज होण्याचा मान मिळवला आहे. बुमराहचे रेटिंग ८६२ असून तो दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे.

बांगलादेशविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत स्टार्कच्या कामगिरीचा त्याला मोठा फायदा झाला. पहिल्या कसोटीत स्टार्कला केवळ २ विकेट मिळाल्या आणि ऑस्ट्रेलियाला त्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. मात्र, दुसऱ्या कसोटीत त्याने जबरदस्त पुनरागमन केले. पहिल्या डावात केवळ १२ धावा देत त्याने ६ विकेट घेतल्या, तर दुसऱ्या डावात ३९ धावांत ४ विकेट मिळवल्या. या सामन्यात एकूण १० विकेट घेत स्टार्कने ऑस्ट्रेलियाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. त्यामुळे मालिका १-१ अशी बरोबरीत राहिली.
जवळपास ३६ वर्षांच्या स्टार्कसाठी हे अव्वल स्थान विशेष ठरले आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत पहिल्यांदाच आयसीसी कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत पहिला क्रमांक मिळवला आहे. दरम्यान, भारत-श्रीलंका कसोटी मालिकेसाठी सुरुवातीला बुमराहचा भारतीय संघात समावेश करण्यात आला होता. मात्र, तो पूर्णपणे तंदुरुस्त असेल तरच खेळणार, अशी अट होती. बुमराह पुरेसा तंदुरुस्त नसल्याने अखेर त्याला मालिकेतून बाहेर ठेवण्यात आले.
श्रीलंका मालिकेपूर्वी बुमराहचे रेटिंग ८७० होते आणि तो क्रमवारीत पहिल्या स्थानावर होता. मात्र, मालिकेतील दोन्ही सामने न खेळल्याने त्याचे रेटिंग ८६२ पर्यंत खाली आले आणि स्टार्कने त्याला मागे टाकले. आता बुमराहला पुन्हा अव्वल स्थान मिळवण्यासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागू शकते. भारत श्रीलंका मालिकेनंतर नोव्हेंबरमध्ये कसोटी सामने खेळणार आहे. त्यामुळे त्या मालिकेत बुमराहला पुन्हा नंबर वन स्थान मिळवण्याची संधी उपलब्ध होऊ शकते.