अनिल कांबळे
high-court-reprimands-the-municipal-corporation नागपूर: रामदासपेठ, काचीपुरा येथील हॉटेल मालकांकडून वादग्रस्त जागेचा गैरवापर आणि बेकायदेशीर कृत्य रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करा, अशा शब्दांत मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने मनपाला चांगलेच फटकारले आहे. डॉ. ललित बेनीराम हारोडे व इतरांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फाळके आणि न्यायमूर्ती राज वाकोडे यांच्यासमक्ष सुनावणी झाली.
उच्च न्यायालयाने पूर्वी दिलेल्या आदेशांचे पालन होत नसल्याचे याचिकाकर्त्यांनी निदर्शनास आणून दिले. बंदी असलेल्या जागेत जाण्यासाठी अजूनही लाकडी पाट्यांचा वापर केला जात आहे. महापालिकेच्या वतीने न्यायालयात सांगण्यात आले की, त्या जागेवर वीजवाहिन्या (केबल्स) असल्याने काम थांबले आहे. यासाठी महावितरणला पत्र पाठवले असून उत्तराची वाट पाहत आहोत. न्यायालयाने महापालिकेचा हा दावा फेटाळून लावला. केवळ पत्र लिहून चालणार नाही, तर प्रशासनाला प्रत्यक्ष आणि ठोस पावले उचलावी लागतील, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
या जागेचा वापर रोखण्यासाठी काय तात्पुरत्या व कायमस्वरूपी उपाययोजना केल्या. याचा सविस्तर अहवाल प्रतिज्ञापत्राद्वारे सोमवारपर्यंत सादर करण्याचे आदेश मनपाला कोर्टाने दिलेत. मनपातर्फे अॅड. जेमिनी कासट यांनी बाजू मांडली.
बजाजनगर पोलिसांचे कान टोचले
दारूच्या नशेत हुल्लडबाजी करणाऱ्यांवर काय कारवाई केली?, याचा अहवाल सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने बजाज नगर पोलिसांना दिले. या प्रकरणी पुढील सुनावणी शुक्रवारी, ४ सप्टेंबर रोजी होणार आहे.