नवी दिल्ली,
etpla क्रिकेटविश्वात आणखी एका टी-२० लीगची सुरुवात होत असून, युरोपियन टी२० प्रीमियर लीगचा (ईटीपीएल २०२६) पहिला हंगाम बुधवार, २६ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. युरोपमधील फ्रँचायझी क्रिकेटला नवी ओळख मिळवून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत सहा संघ सहभागी झाले आहेत. २० सप्टेंबर रोजी अंतिम सामना होणार असून, स्पर्धेला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची (आयसीसी) मान्यता मिळाली आहे.

क्रिकेट आयर्लंड, क्रिकेट स्कॉटलंड आणि रॉयल डच क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही लीग आयोजित करण्यात आली आहे. २६ दिवस चालणाऱ्या पहिल्या हंगामात एकूण ३२ सामने खेळवले जाणार आहेत. सहा संघ डबल राऊंड-रॉबिन पद्धतीने साखळी फेरीत खेळतील आणि प्रत्येक संघाला १० सामने मिळतील. गुणतालिकेतील अव्वल संघ थेट अंतिम फेरीत पोहोचेल. दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावरील संघ १९ सप्टेंबरला पात्रता सामना खेळतील. या सामन्यातील विजेता २० सप्टेंबरला होणाऱ्या अंतिम सामन्यात अव्वल संघाशी भिडेल. ईटीपीएलचे सामने नेदरलँड्स आणि आयर्लंड या दोन देशांमध्ये होणार आहेत. सुरुवातीचे १७ सामने नेदरलँड्समधील वूरबर्ग येथील स्पोर्टपार्क डुइवेस्टाइन येथे खेळवले जातील. त्यानंतर उर्वरित सामने आयर्लंडमधील डब्लिन येथील मालाहाइड क्रिकेट क्लबमध्ये होतील. १८ ते ३२ क्रमांकाचे सामने, तसेच प्लेऑफ आणि अंतिम सामना याच मैदानावर खेळवला जाणार आहे.
या स्पर्धेत ॲमस्टरडॅम फ्लेम्स, रॉटरडॅम डॉकर्स, डब्लिन गार्डियन्स, बेलफास्ट वुल्व्स, ग्लासगो कॉस्मिक्स आणि एडिनबर्ग कॅसल रॉकर्स हे सहा संघ सहभागी आहेत. त्यामुळे अनेक आंतरराष्ट्रीय आणि माजी आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या उपस्थितीमुळे लीगची उत्सुकता वाढली आहे. ॲमस्टरडॅम फ्लेम्सकडून स्टीव्ह स्मिथ, टिम डेव्हिड, स्कॉट एडवर्ड्स आणि भारताचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणे खेळणार आहेत. रॉटरडॅम डॉकर्सच्या संघात फॅफ डु प्लेसिस, हेनरिक क्लासेन, ॲनरिच नॉर्खिया आणि जय मुंद्रा यांचा समावेश आहे. डब्लिन गार्डियन्सचे नेतृत्व भारताचा दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विन करणार आहे.
बेलफास्ट वुल्व्समध्ये ग्लेन मॅक्सवेल आणि आयर्लंडचा पॉल स्टर्लिंग हे प्रमुख खेळाडू आहेत. एडिनबर्ग कॅसल रॉकर्सकडून मिचेल सँटनर आणि ट्रेंट बोल्ट मैदानात उतरतील. ग्लासगो कॉस्मिक्सचे नेतृत्व जॉर्ज मुन्सी करणार असून दक्षिण आफ्रिकेचे लुंगी एनगिडी आणि केशव महाराज हे देखील या संघाचा भाग आहेत. भारतात ईटीपीएल २०२६ चे सामने स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट पाहता येणार आहेत. डिजिटल माध्यमातून सामन्यांचे लाइव्ह स्ट्रीमिंग जिओहॉटस्टारवर उपलब्ध असेल. स्पर्धेचे सामने जगभरातही थेट प्रक्षेपित केले जाणार आहेत.