दलीप ट्रॉफी सेमीफायनलमध्ये वैभवची एन्ट्री

    दिनांक :26-Aug-2026
Total Views |
नवी दिल्ली,
duleep trophy semi final भारतीय देशांतर्गत क्रिकेट हंगामातील दलीप ट्रॉफी 2026 मधील उपांत्य फेरीचे चित्र स्पष्ट झाले आहे. क्वार्टर फायनलचे सामने पूर्ण झाल्यानंतर ईस्ट झोन, सेंट्रल झोन, नॉर्थ झोन आणि साऊथ झोन यांनी सेमीफायनलमध्ये प्रवेश निश्चित केला आहे. 23 ऑगस्टपासून झालेल्या क्वार्टर फायनलमध्ये ईस्ट झोनने नॉर्थ ईस्ट झोनचा एक डाव आणि 210 धावांनी पराभव करत उपांत्य फेरी गाठली. दुसऱ्या सामन्यात नॉर्थ झोनने वेस्ट झोनवर 52 धावांनी मात करत सेमीफायनलचे तिकीट मिळवले. आता ईस्ट झोनचा सामना सेंट्रल झोनशी, तर नॉर्थ झोनची लढत साऊथ झोनशी होणार आहे.

duleep trophy semi final
या सामन्यांमध्ये सर्वांचे लक्ष वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीकडे असणार आहे. नॉर्थ ईस्ट झोनविरुद्धच्या क्वार्टर फायनलमध्ये वैभवला ईस्ट झोनकडून केवळ एकदाच फलंदाजीची संधी मिळाली. त्याने 8 धावा केल्या. मात्र, गोलंदाजीत त्याने प्रभाव पाडत 2 विकेट घेतल्या. आता सेमीफायनलमध्ये त्याच्याकडून फलंदाजीत मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. ईस्ट झोन आणि सेंट्रल झोन यांच्यातील पहिला सेमीफायनल सामना 30 ऑगस्टपासून होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 9.30 वाजता बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सीलेंस ग्राउंड-1 वर सुरू होईल. सेंट्रल झोनचे नेतृत्व रजत पाटीदार करणार असून त्यांच्या संघात रिंकू सिंह आणि हर्ष दुबे यांच्यासारख्या खेळाडूंचा समावेश आहे.
 
दुसऱ्या सेमीफायनलमध्ये नॉर्थ झोनसमोर साऊथ झोनचे आव्हान असेल. हा सामनाही 30 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. साऊथ झोनचे नेतृत्व तिलक वर्मा करणार असून संघात नारायण जगदीशन आणि करुण नायर यांसारखे अनुभवी खेळाडू आहेत. त्यामुळे दोन्ही उपांत्य सामन्यांकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.